नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 3-0 असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणार्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी-20 सामन्यांत नाबाद राहिला. तिसर्या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद 57 धावा केल्या आणि संघाला 7 गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याला नशिबाचीदेखील चांगलीच साथ मिळाली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम श्रीलंकेला फलंदाजीची संधी दिली. त्यात श्रीलंकेने 142 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवार डेव्हिड वॉर्नर याला फलंदाजी करताना नशिबाची जोरदार साथ मिळाल्याचे दिसून आले. वॉर्नर फलंदाजी करत असताना लाहिरू थिरीमनेने चेंडू टाकला. वॉर्नरने बचावात्मक फटका खेळत चेंडू थांबवला, पण चेंडू बॅटला लागून स्टम्पला लागला. तसे होऊनही वॉर्नरचे नशीब बलवत्तर ठरले.
चेंडू स्टम्पला लागला तरीही बेल्स पडली नाही. त्यामुळे अक्षरश: ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.