छोट्या कुटुंबांचा पुरस्कार करीत मोदींनी यातच अस्सल राष्ट्रप्रेम दडलेले आहे, असेही म्हटले. लोक सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न नसतील तर त्यांचे घर वा देशही सुखी असू शकणार नाही, असे सांगत मोदीजींनी कुटुंब छोटे राखण्याची कृती ही राष्ट्रप्रेम दर्शवणारीच आहे आणि ज्यांनी तसे केले असेल ते आमच्या अभिनंदनास पात्र आहेत. अशांचा सत्कार केला पाहिजे, असे प्रतिपादनही मोदींनी केले.
अगदी आता-आतापर्यंत आपण आपली बहुसंख्य लोकसंख्या तरुण आहे याबद्दल आनंद व्यक्त करत होतो, परंतु परिस्थिती झपाट्याने पालटते आहे. मुळातच अफाट लोकसंख्येचा विकसनशील देश असलेल्या भारताला आपल्या लोकसंख्येचे ओझे अनेक वर्षे जाणवत आले आहे. मधला काही काळ आपण मोठी बाजारपेठ असल्याच्या आनंदात घालवली खरी, परंतु झपाट्याने बदलत चाललेले तंत्रज्ञान व जागतिक आर्थिक परिस्थिती या सार्या घटकांच्या चौकटीत देशाची बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनून डोके वर काढतो आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कालच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून बोलताना या प्रश्नाच्या गांभीर्याकडे अवघ्या देशाचे लक्ष वेधले हे योग्यच झाले. आणि नुसते तेवढेच करून ते थांबले नाहीत तर लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी आता ठोस पावले उचलावी लागणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. आम्ही समस्या टाळत नाही आणि समस्या पाळतही नाही, असे म्हणणारे मोदीजी आता लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना घेऊन येतात ते लवकरच दिसेल. परंतु तोवर त्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्य सरकारांनीही लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहेच. छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हे जितके खरे आहे, तितकेच देशाच्या अर्थव्यवस्थेला तारायचे असल्यास लोकसंख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल हेही खरे आहे. कारण लोकसंख्या अशीच बेसुमार वाढत राहिली तर कितीही प्रगती झाली तरी नागरिकांचे दरडोई उत्पन्न काही वाढणार नाही. अर्थव्यवस्था कितीही वाढली तरी त्यावर हक्क सांगण्यास पुढे सरसावणारे हात सतत वेगाने वाढतच राहणार असतील तर प्रत्येकाचा हिस्सा कमी होतच राहील. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण हवे ते हा हिस्सा वाढावा याकरिता आणि त्याची गरज स्वत: मोदीजींनी बोलून दाखवली आहे. अर्थात, त्यांच्या या विधानाचा रोख मुसलमानांची लोकसंख्यावाढ रोखण्याकडे तर नाही ना, अशी शंकेची पाल काही नाठाळांच्या मनात नक्कीच डोकावली असणार. मोदीजींच्या या वक्तव्यानंतर लगेचच एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून छोट्या कुटुंबांचा मोदीजींनी केलेला पुरस्कार ही जुनाट व हस्तक्षेपी भूमिका असल्याची टीका केली. मात्र, अफाट लोकसंख्या वाढीमुळे पुढील पिढ्यांना अनेकानेक आव्हानांचा सामना करावा लागेल याकडे लक्ष वेधून मोदीजींनी त्या विरोधात मोहीम उघडण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रश्नांना थेट धडक देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असा आक्रमक पवित्राही मोदीजींनी घेतला आहे. अर्थातच लोकसंख्या वाढ रोखताना ते प्रयास सर्व धर्मियांना लागू राहिले पाहिजेत. कारण कमी लोकसंख्या म्हणजे प्रगती हे समीकरण शंभर टक्के सत्य असून लवकरच भारत लोकसंख्येच्या संदर्भात चीनला मागे टाकण्याची चिन्हे असल्यामुळेच वेळीच उपाययोजनेवर लक्ष देण्याची गरज आहे.