पनवेल : वार्ताहर
कौटुंबिक वादातून कपडे धुण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या आपल्या पत्नीस पतीने लाथाबुक्क्याने, तसेच दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. पनवेल तालुक्यातील भेरले, कातकरवाडी मोठे भिंगार येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार कल्पना ऊर्फ पिंकी आदेश वाघमारे (24) यांचे लग्न पती आदेश तात्या वाघमारे (26) याच्याबरोबर झाले होते, परंतु लग्न झाल्यापासून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत व पती माहेरून पैसे आण म्हणून त्यांना मारहाण करून शिवीगाळ व मानसिक आणि शारीरिक छळ करीत असे. भेरला कातकरीवाडीच्या पलीकडे असणार्या पाण्याच्या डोहावर कल्पना वाघमारे व त्याची बहीण निकिता असे कपडे धुण्यासाठी गेले असता तिचा पती तेथे आला व तू घरी चल, असे त्याने सांगितले. यावर तिने घरी गेल्यावर तुम्ही मला मारहाण करता त्यामुळे मी घरी येणार नाही, असे उत्तर देताच आरोपीने तू घरी कशी येत नाही तुला बघतोच, असे बोलून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच तिच्या दोन्ही हाताला व डोक्यात दगडाने मारून व कपाळावर लाकडी दांडक्याने मारून गंभीर दुखापत केली. याबाबतची तक्रार तिने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देताच आरोपीस तालुका पोलिसांनी अटक केली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनेष साबळे करीत आहेेत.
– कोळखेतून युवक बेपत्ता
पनवेल : वार्ताहर
तालुक्यातील कोळखे पेठ येथे राहणारा 19 वर्षीय युवक राहत्या घरातून कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडला तो अद्याप घरी न आल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शाकीब शकील कुरेशी (19, रा. वास्तुविहार अपार्टमेंट, 301, कोळखे पेठ) हा घरात झालेल्या किरकोळ वादातून घराबाहेर पडला. तो अद्याप घरी परतला नाही. तो रंगाने सावळा, अंगाने मध्यम, डोळे काळे, नाक सरळ, डोक्याचे केस काळे मध्यम, चेहरा उभट, उंची 5 फूट 3 इंच असून अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची फुलपॅन्ट घातली आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे, तसेच त्याच्याजवळ एक मोबाईल फोनसुद्धा आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस नाईक एस. व्ही. मासुळ यांच्याशी संपर्क साधावा.
– ब्रीजखाली आढळला मृतदेह
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलसमोर ब्रीजखाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, उंची 5 फूट 4 इंच, रंग काळा सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, दाढी बारीक, डोक्याचे केस काळे असून अंगात काळ्या व निळ्या रंगाची फूल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक ए. बी. संखे यांच्याशी संपर्क साधावा.
– अपघातात वृद्धाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर
अज्ञात वाहनाची ठोकर बसल्याने 90 वर्षीय वृद्ध इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खुटारी गावाजवळ घडली आहे.
मुंब्रा-पनवेल मार्गावरील खुटारी गावाजवळ क्लिन सिटी बिल्डिंग शेजारील शामियाना हॉटेलसमोरील रस्त्यावर एका व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्यात सदर व्यक्ती गंभीररीत्या जखमी होऊन मयत झाला आहे. त्या इसमाचे नाव नामा गायकवाड (90) असे असल्याचे समजते. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
– दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण
पनवेल : वार्ताहर
कळंबोली येथे राहणार्या 12 व 13 वर्षीय मुलांचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. ओंकार जाधव (13) व साहेब अशोक कश्यप (12) असे या दोघांची नावे असून, दोन्ही मुले घरात न सापडल्याने त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओंकार जाधव हा अंगाने मजबूत, केस काळे, उंची 4 फूट 2 इंच, नाक सरळ, उजव्या हातावर आई असे गोंदलेले आहे. अंगात हिरव्या रंगाचा हाफ शर्ट व क्रिम रंगाची फूल पॅन्ट, तसेच पायात चप्पल आहे, तर अशोक कश्यम हा अंगाने सडपातळ केस काळे, उंची 4 फूट 5 इंच, नाक सरळ, अंगात निळ्या रंगाचा फूल टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, तसेच पायात काळ्या व पिवळ्या रंगाच्या सॅण्डल घातलेल्या आहेत. या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.