पाऊस अजूनही सुरूच आहे. आता तसा थंडीचा महिना सुरू झाला आहे. गुलाबी थंडीत आता पर्यटनासाठी लोंढे बाहेर पडतील. पर्यटनाची व्याख्या आता बदलली आहे. लोकांच्या खिशात पैसा आला आहे. त्यामुळे साधी पाण्याची बाटलीही सोबत न्यायला आता लाज वाटते. बदलत्या पर्यटनामुळे निसर्गसौंदर्याला बाधा येत आहे. पर्यटनस्थळे प्रदूषित होत आहेत. पर्यटकांनी पर्यटन करताना तसेच आनंद लुटताना निसर्गसौंदर्य जपायला हवे.
सातत्याने आकारमानाने वाढत चाललेले खिसे, क्रेडिट कार्डच्या बळावर होणार्या पर्यटनाने उपभोक्तावादाला खतपाणी घातले. नोे-फ्रिल्स एअरलाइन्सच्या जमान्यात प्रवाशांचे कार्बन फूटप्रिंट वाढले आहे. आपल्या घरची पोळी-भाजी, पाण्याची बाटली सोबत घेऊन जाणे हे मागासलेपणाचे लक्षण ठरले असून, आता अॅपवरून जेवण मागवणे, पाण्याची बाटली खरेदी करणे ही आधुनिकतेची ओळख बनली आहे. डोंगरदर्यांत बीअरचे कॅन, प्लास्टिकच्या बाटल्या दिसणे सामान्य बाब झाली आहे. म्हणूनच पर्यटकांना संवेदनशील बनवणे जेवढे आवश्यक, तितकेच पर्यटनाला नियंत्रित ठेवणेही गरजेचे ठरत आहे. पर्यटकांची संख्या निश्चित असावी, नोंदणी अनिवार्य करावी. कुठलीही पूर्वतयारी आणि माहिती नसताना टे्रकिंगवर निघण्याची जी सवय आहे तिला वेसण घालणे आवश्यक आहे. तीर्थक्षेत्र, सरोवर, वने, डोंगरदर्या, नदीनाल्यांची काळजी आपण आज घेऊ शकलो, तर नव्या पिढीला ही रम्य स्थळे पाहता येतील. टिकाऊ पर्यटनाचा मार्ग सामान्यत: जबाबदार पर्यटकांद्वारे जातो. अन्य देशांत ज्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तवाच्या मदतीने लोकांना पर्यटनाचा आनंद घडवला जातो, त्या पद्धतीने आभासी पर्यटनाच्या माध्यमातून घसबसल्या पर्यटनाचा आनंद लुटण्याची व्यवस्था करता येऊ शकते. अलास्काचे बर्फाळ डोंगर, अंटार्क्टिकातील विलोभनीय दृश्ये आदी पर्यटनस्थळांसोबतच नासाच्या मदतीने अंतराळ आणि ग्रहांपर्यंतचा रोमांचक प्रवासही घडवला जाऊ शकतो. त्यासाठी गुगल अर्थचे योगदान अधिक महत्त्वाचे ठरते. आभासी पर्यटनामुळे वास्तवाचा आनंद मिळणार नाही हे खरे असले तरी फालतू गर्दी, गोंगाट टाळता येऊ शकतो. प्रवाशांचे नियंत्रण, संवेदनशील स्थळांवर नोंदणी आणि अतिसंवेदनशील ठिकाणी व्हीआर टेक्नॉलॉजीसारखे अनेकविध उपाय जबाबदार पर्यटन साकार करू शकतात. नव्या तंत्रज्ञानाने पर्यटन अधिक सुलभ केले. इतकेच नव्हे तर त्याचे स्वरूपदेखील बदलून टाकले. आता रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ ’इन्स्टाग्रामेबल’ झाले आहेत. मुक्कामी स्थळे ’फेसबुक चेक-इन’वर आली आहेत. त्यामुळे आता पर्यटन हे शहरांच्या सीमेपासून ते मैलोन्मैल लांब ट्रॅफिक जामच्या वळणावर येऊन ठेपले आहे. जो प्रवास स्वत:ला स्वत:चीच भेट घडवायचा, ओळख करून द्यायचा तो लुप्त झाला असून त्याची जागा व्हॅकेशन-हॉलिडेसारख्या ग्लॅमरने घेतली आहे. मिलेनियल ते हॅशटॅग आणि जनरेशन झेडपर्यंत असा पर्यटनाचा प्रवास झाला, तथापि अस्वस्थता, दिखाऊपणा, स्पर्धा, अडचणी-संकटे हल्ली अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटन करताना पूर्वतयारी करणे महत्त्वाचे आहे. कोकणासारख्या ठिकाणी ट्रेकिंगला जाताना काळजी घ्यायला हवी. निसर्गाला बाधा येणार नाही हे लक्षात घेऊन पर्यटन केल्यास आपल्याला आणि पुढील पिढीलाही आनंद मिळेल. खर्या अर्थाने पर्यटनाचा नवा मार्ग चोखाळायला हवा.