रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा आणि आज तो बालेकिल्ला संपुष्टात आला आहे.हे महत्त्वाचे राजकीय कार्य रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पार पाडले आहे. एक-दोन नाही तर तब्बल युतीचे पाच आमदार आणि भाजपचा सहयोगी सदस्य असे सहा आमदार युतीच्या विचारांचे निवडून आले आहेत.
काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा रायगड जिल्हा बालेकिल्ला समजला जायचा. 1995मध्ये राज्यात शिवशाहीचे सरकार आले. त्यावेळीदेखील शिवसेनेचे तीनच आमदार निवडून आले होते, मात्र मागील दीड-दोन वर्षे कार्यकर्त्यांना समजून घेत महायुतीचे घोडे पुढे पळविण्याचा प्रयत्न, त्यात शेकापला थेट आव्हानदेखील पालकमंत्र्यांकडून दिले गेले. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा काळ जिल्ह्यातील सत्तेवर असलेल्या शेकाप-राष्ट्रवादी यांच्यासाठी त्रासदायक होता. त्यांच्याकडून आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांनादेखील जिल्हा परिषदेचे सत्ताधारी बोलावत नव्हते. त्याआधी पालकमंत्री असलेले प्रकाश मेहता यांचा कार्यकाळ जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी यांच्यासाठी फायद्याचा होता, मात्र जिल्ह्यात वरचढ होण्याची एकही संधी
पालकमंत्र्यांकडून सोडली जात नव्हती, पण त्याआधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधून शेकापला हद्दपार केले होते. पालकमंत्र्यांनी शेकापचा अलिबाग, पेणचा सुभा खाली आणण्यासाठी नियोजनबद्ध काम केले. त्यातून रवींद्र पाटील यांना काँग्रेसमधून भाजपत आणले. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण यांची खरी कसोटी विधानसभा निवडणुकीत दिसणार होती.कारण मावळ सर केला असताना रायगड मात्र युतीच्या हातातून गेल्याने पालकमंत्र्यांची परीक्षा पाहणारा तो काळ होता आणि त्या परीक्षेत पालकमंत्री 100 टक्के गुणांनी यशस्वी झाले आहेत.
राज्यात भाजप-सेना यांची युती झाली, मात्र उरण विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा सरचिटणीस असलेले महेश बालदी यांनी दंड थोपटल्याने युतीवर परिणाम होणार होता, मात्र अख्खी भाजप या मतदारसंघातील प्रचारात उतरल्याने ते भाजप उमेदवार असल्यागत वाटत होते आणि त्यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. आमदार मनोहर भोईर यांना पराभवाचा फटका बसला आहे, मात्र महेश बालदी यांना उरण मतदारसंघ बांधण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी मदत केल्यामुळे महेश बालदी यांचे स्वप्न साकार झाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण मतदारसंघात भाजपची पेरणी केल्याने तेथे रवी पाटील भाजपचे आमदार झाले. त्यांना भाजपत घेऊन त्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी रवी पाटील यांना मदत केली. त्यामुळे तिकडे जाऊन पाहणी दौरा, संघटना बांधणी करणे असे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यामुळे भाजपचा एक आमदार असताना आता जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार झाले आहेत. पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर निवडून आले तिकडे पालकमंत्री अधिक लक्ष देत असत. पालकमंत्री चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यातील भाजप अधिक मजबूत करीत सेना-भाजपचे आमदार निवडून येतील अशी रणनीती पालकमंत्री चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सहा युतीचे आमदार झाले आहेत.
कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी आणि सेना असा सामना झाला होता. त्यामुळे सेनेकडून महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीकडून सुरेश लाड उभे होते. युती झाल्याने महेंद्र थोरवे निवडून आले, मात्र थोरवे यांच्यामागे पालकमंत्री चव्हाण उभे होते. थोरवे यांनी पालकमंत्र्यांकडून संघटनेचे धडे गिरवले होते. त्याचा फायदा आमदार महेंद्र थोरवे यांना झाला आहे. कर्जत मतदारसंघात भाजप मजबूत नसल्याने युती झाली नसती तर महेंद्र थोरवे यांना पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात होती, पण युती झाल्याने अखेर थोरवे यांच्या गळ्यात सेनेचे तिकीट पडले. त्या वेळी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी महेंद्र थोरवे यांना साथ देत कर्जत मतदारसंघ शिवसेनेकडे पुन्हा मिळविण्यासाठी केलेले नियोजन यशस्वी ठरले आहे. त्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कर्जतमध्ये केवळ एका तासासाठी येणे थोरवे यांची गणिते बदलून टाकणारे ठरले आहे.
तिकडे शेकापचा गड फोडण्याचे शिवधनुष्य हाती घेऊन गेली दीड वर्षे कार्यरत असलेल्या पालकमंत्री चव्हाण यांनी मग अलिबाग, मुरूडमध्ये भारतीय जनता पक्ष युतीसाठी मैदानात उतरवला. भाजप त्या ठिकाणी पालकमंत्री आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या विचाराने शेकापचा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी सज्ज होता. त्यामुळे 2014मध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले महेंद्र दळवी यांच्या पाठीशी नव्याने बांधणी झालेली भाजप मदतीला आली आणि दळवींचे मताधिक्य शेकाप तोंडात बोटे घालत बसेल एवढे प्रचंड वाढले. महाडमध्ये भरत गोगावले यांच्या आसपास आघाडीचा उमेदवार नाही हे सलग तिसर्यांदा दिसून आले असून पालकमंत्र्यांचे महाडवर असलेले प्रेम आणि भाजपचे निर्माण झालेले संघटन यामुळे महायुतीचा मोठा विजय मिळविण्याचे उद्दिष्ट यशस्वी ठरले आहे.
अशा प्रकारे महायुतीचे पाच व अपक्ष परंतु संपूर्ण भाजप मैदानात उतरून उरणमध्ये मिळविलेला विजय असे सहा आमदार रायगडने महायुतीला पहिल्यांदा दिले. यात सर्वाधिक वाटा पालकमंत्र्यांचा असून ते हा विजय महायुतीचा असल्याचे स्पष्ट करतात. रायगडमधील जनतेने शेकापला धडा शिकवला आहे. रायगडच्या विकासकामांत नेहमी शेकाप विकासाला विरोध करीत होता. त्यामुळे रायगडचा विकास होत नव्हता. युतीचे सहा आमदार निवडून आल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनखाली रायगडचा झटपट विकास साध्य होईल.
-santosh perane