खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष शास्त्र फाउंडेशन कोर्स विषयाच्या विद्यार्थ्यांनी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला स्वेच्छेने आर्थिक तसेच धान्य आणि अन्य आवश्यक वस्तूंची मोठी मदत केली आहे. ही मदत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांच्या हस्ते केंद्राचे समन्वयक श्री. ध्रुव, कु. लक्ष्मी, श्री प्रशांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्र ही संस्था मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी खूप मोठे सामाजिक कार्य करीत आहे. खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाालच्या फाउंडेशन कोर्स विषयाचे प्रा. मुकेश रूपवते यांच्या प्रयत्नाने 2008 सालापासून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून श्रद्धा पुनर्वसन केंद्राला मदत केली जात आहे. कोरोनाच्या काळातही या केंद्राला महाविद्यालयाने मदत केली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पदवी शिक्षण घेतानाच सामाजिक जाण, समाजाप्रती आत्मीयता व विश्वबंधुत्वाची जाणीव रुजावी या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे प्रा. मुकेश रुपवते यांनी या विशेष कार्यक्रमात सांगितले. केंद्राचे समन्वयक श्री. ध्रुव यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सर्व उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. स्व-विकासाबरोबरच विद्यार्थ्यांनी समाज विकासामध्ये आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश अभाणी, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. अशोक कंधारे, इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. जी. पी. मुळीक, मराठी विभागाचे डॉ. भाऊसाहेब नन्नवरे, एनसीसीच्या एएनओ प्रा. शीतल गायकवाड यांच्यासह विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.