ठिकठिकाणी कचर्याचे ढीग; स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह
खोपोली : प्रतिनिधी
स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोलीचा नारा नगरपालिकेसाठी कागदावर असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र सदर ठेकेदाराची मनमानी व त्यावर नियंत्रण ठेवणार्या नगरपालिका अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे खोपोली शहरातील अनेक रहिवासी भाग, भाजी मंडई, मटण मासळी मार्केट, विविध रस्ते आणि मोकळ्या जागेत जमा होत असलेला कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप अनेक नगरसेवक व नागरिक करीत आहेत. निर्माण होणारा दैनंदिन घनकचरा उचलणे व त्याच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेला ठेकेदार व नगरपालिका कर्मचार्यांची स्वतंत्र विशेष टीम कार्यरत आहे. कचरा उचलण्यासाठी आधुनिक हायड्रोलिक घंटागाड्या आहेत. दररोज सरासरी 28 मॅट्रिक टन कचरा उचलण्यात येत असल्याचा दावा ठेकेदाराकडून केला जात असून, त्यानुसार त्याला नगरपालिकेकडून बिलेही अदा होत आहेत. त्यासाठी नगरपालिकेकडून वार्षिक 12 ते 15 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. दररोज 28 मॅट्रिक टन कचरा उचलला जात असल्याचा दावा खोपोली नगरपालिकेकडून केला जात असला तरीही शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग पडून असल्याचे चित्र कायम असल्याने कचरा व्यवस्थापन व संबंधित ठेकेदार व यंत्रणेत साटेलोटे सुरू असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकारी व माजी आरोग्य सभापती माधवी रिठे यांचे पती लक्ष्मण उर्फ तात्या रिठे यांनी केला आहे.
सार्वजनिक स्वच्छतेबाबत येणार्या तक्रारी व दैनंदिन कामकाजाबाबत आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे आणि नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्याकडून सतत दखल घेतली जात आहे. यासंबंधी दैनंदिन कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, तसेच मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडून स्वच्छता विभागातील अधिकारी, ठेकेदार व कर्मचार्यांच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. तरीही सार्वजनिक स्वच्छतेबाबत समाधानकारक सुधारणा होत नसल्याने नगरसेवकांतही संतापाचे वातावरण आहे.
घनकचरा व्यवस्थापन व दैनंदिन साफसफाईच्या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे. कामचुकार ठेकेदार, नगरपालिका अधिकारी व कर्मचार्यांना कडक ताकीद देण्यात आली आहे. कचरा किंवा स्वच्छतेसंबंधी कोणतीही तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही होऊन समस्या दूर केली जाते. तरीही काही ठिकाणी समस्या असेल व स्वच्छता कर्मचारी दुर्लक्ष करीत असतील तर याची दखल घेऊन योग्य निर्देश देण्यात येतील.
-प्रमिला सुर्वे, आरोग्य सभापती, खोपोली नगरपालिका