ऑस्ट्रेलिया करणार भारताचा दौरा
मुंबई : प्रतिनिधी
ऑस्ट्रेलिया दौर्यात कसोटी आणि वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ ‘कांगारूं’चा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौर्यावर येणार आहे. या दौर्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. विश्रांती देणार्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे आणि लोकेश राहुल व अजिंक्य रहाणे संघात कमबॅक करण्याची शक्यता आहे. याआधी कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या दोन वन डे व ट्वेन्टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.
कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात कमबॅक करू शकतो. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ऑसींविरुद्ध कोहली व रोहित या दोघांना विश्रांती दिल्यास कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व सांभाळेल. वर्ल्डकप संघात दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील.
मर्यादित षटकांच्या सामन्यांत कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल ही जोडी धुमाकूळ घालत आहे, मात्र त्यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराचे कमबॅक होऊ शकते. ऑस्ट्रेलिया दौर्यातील वन डे मालिकेत आणि संपूर्ण न्यूझीलंड दौर्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशात भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांना विश्रांती मिळू शकते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेन्टी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळूरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरू होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर (5 मार्च), रांची (8 मार्च), मोहाली (10 मार्च) व दिल्ली (13 मार्च) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.
