Breaking News

निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता

रितेश तिवारी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा 19 वर्षांखालील मुलांच्या निवडचाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल क्रिकेट असोसिएशनने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पनवेलने अलिबाग क्रिकेट असोसिएशनचा 8 गडी राखून पराभव केला. अलिबागचा रितेश तिवारी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

उरण स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनच्या यजमानपदाखाली उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अलिबाग आणि पनवेल यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अलिबागने प्रथम फलंदाजी करताना 114 धावा केल्या. पनवेलने 2 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा करून हा सामना जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली.

पनवेलच्या चिन्मय पाटील (4 बळी) व मानस लाले (2 बळी) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे अलिबागची 7 बाद 35 अशी केविलवाणी अवस्था झाली होती, परंतु कर्णधार रितेश तिवारीने जिद्दीने फलंदाजी करून 60 धावा केल्या. त्याला प्रथमेश टक्केने  (17 धावा) साथ दिली. त्यामुळे अलिबागचा संघ 114 धावा करू  शकला. मल्हार वंजारी (56 धावा), अभिषेक पाटील (25 धावा), रिद्देश भाटकर (21 धावा) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे पनवेलने 2 गडी गमावून 115 धावा केल्या.

चिन्मय पाटील याची अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानस लाले याची निवड करण्यात आली. रितेश तिवारी याला स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या 14 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल उरणचा खेळाडू चैतन्य पाटील याचा सत्कार करण्यात आला.

सुधीर घरत, नूतन पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव विवेक बहुतुले, पंच समितीचे समन्वयक सुयोग चौधरी, सुहास हिरवे, चंद्रकांत म्हात्रे, प्रशांत माने यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरीट पाटील, प्रशांत माने, सचिन म्हात्रे, सुरेश पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply