पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषणाने वेढले आहे. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी व कचरा, वाळू उपसा यामुळे अंबा नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नदी संवर्धनाची मागणी होत आहे. खालापूर तालुक्यातील चावणी आंबेनळी घाट व सुधागड तालुक्यातील मानखोरे या दोन ठिकाणांहून अंबा नदीचा उगम होतो आणि पुढे हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मोठी नदी तयार होते. अनेक गावे समृद्ध करत ही नदी वडखळजवळ खाडीला जाऊन मिळते. खालापूर, सुधागड, रोहा आणि पेण अशा चार तालुक्यातून अंबा नदी वाहते. यातील सर्वाधिक प्रवास सुधागड तालुक्यातून होतो. मात्र सांडपाणी, शेवाळ, प्लास्टिक व केमिकल्समुळे अंबा नदी प्रदूषित झाली आहे. नदीपात्रात अवैध वाळू उपसादेखील होत आहे. नदी किनार्यावरदेखील घाण व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यातील ग्रामस्थ व प्राण्यांच्या आरोग्याबरोबरच अंबा नदीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.
ज्या गावात अंबा नदीमध्ये प्रदूषण केले जात आहे, त्या ग्रामपंचातींवर कारवाई केली जाईल. अंबा नदी शुद्धीकरणासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्याबाबतचे पत्र पाणी पुरवठा मंत्र्यांना दिले आहे.
-रवींद्र पाटील, आमदार, पेण-सुधागड-रोहा मतदारसंघ
आंबा नदीचे पाणी प्रदूषित झाले असेल तर त्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले जाईल. ज्या कोणत्या यंत्रणेमुळे प्रदूषण होत असेल त्यांच्यावर शहानिशा करून कारवाई केली जाईल.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, सुधागड