Breaking News

भाजप-सेनेने एकत्र राहणे काळाची गरज -सुब्रमण्यम स्वामी

मुंबई : प्रतिनिधी

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर शिवसेनेला मार्ग शोधण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा एकत्र यावं, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यापासून अजून राजकीय कोंडी फुटलेली नाही. भाजपकडून सत्तेत 50-50 फॉर्म्युला अमान्य करण्यात आल्यानंतर शिवसेनेने कठोर भूमिका घेतली आहे.  भाजप आणि शिवसेना यांची युती नेहमीच हिंदुत्त्वाच्या मुदद्यावर अभेद्य राहिली. पण अनेकदा यामध्ये बेबनावही पाहायला मिळाला. याच मुद्द्यावर सुब्रमण्यम स्वामींनी बोट ठेवलं आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने मार्ग शोधावा ही माझी विनंती आहे. भाजपातील अनेक नेत्यांना शिवसेनेबाबत तक्रारी आहेत, तितक्याच तक्रारी शिवसेनेच्याही भाजपातील नेत्यांविषयी आहेत हे खरं आहे. पण हिंदुत्ववादी पक्षांना एकत्र येण्यासाठी संयमाची गरज आहे, किमान आणखी एक दशक हे सहन केलेलं कधीही चांगलं आहे, असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामींनी केलं. सुब्रमण्यम स्वामी हे कायम त्यांच्या रोखठोक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत सर्व नेत्यांविरोधात ते रोखठोक बोलतात, शिवाय चांगल्या कामासाठी कौतुकही करतात. अयोध्या खटल्यात सुब्रमण्यम स्वामी यांची सक्रीय भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या व्याख्यानातून ते विविध देशात हिंदुत्वाची भूमिका मांडतात.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply