पेण : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकन खाणे अपायकारक असल्याच्या अफवा मागील काळात सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. यानंतर सरकार तसेच आरोग्य यंत्रणांकडून चिकन, अंडी खाणे आरोग्यास अपायकारक नसल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर झाला. त्यानंतर पोल्ट्री व्यावसायिक आपला व्यवसाय नव्या जोमाने
चालवित आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सद्यस्थितीत बॉयलर कोंबड्यांची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने बॉयलर कोंबडीचे बाजार भाव कडाडले आहे. किरकोळ विक्रेते बॉयलर कोंबडीचे चिकन 140 ते 160 रुपये किलोदरम्यान विकत आहे, तर काही ठिकाणी हा भाव 200पर्यंत आहे.
रायगड जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत पोल्ट्री फार्म आहेत, परंतु बॉयलर कोंबड्या कोरोना व्हायरसचा प्रादर्भाव वाढतो. अशा अफवांमुळे व कोंबडीला मागणी नसल्याने काही पोल्ट्री फार्म बंद करण्यात आले. सुमारे पन्नास टक्के पोल्ट्री फार्म बंद झाल्यामुळे मालाचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने बॉयलर कोंबडीचे चिकन आणि कोरोना विषाणूचा कसलाही संबंध नसल्याचे परिपत्रक जारी केले. आरोग्य यंत्रणांनीही त्याला दुजोरा दिला. यानंतर नागरिकांचा मांसाहार करण्याकडे कल वाढू लागला. आता लॉकडाऊनमुळे बहुतांशी गावांमध्ये चिकन, मटणाची दुकाने ठराविक वेळेत सुरू आहेत, परंतु मटणचा दर अधिक वाढल्यामुळे चिकनला मागणी जास्त वाढू लागली आहे.
पेणमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी नसल्याने अनेक चिकन व्यावसायिक फोनद्वारे ऑर्डर घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध आहे. सध्या 200 रुपये किलो या दराने विक्री होत असून, मागणी वाढल्यास दर वाढण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या अगोदर सोशल मीडियावर झालेल्या अफवेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडे संघटनेच्या वतीने भरपाईची मागणी केली आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने पार्सल सेवा देण्याचे काम सुरू आहे.
-सुनील म्हात्रे, पोल्ट्री व्यावसायिक, पेण
RamPrahar – The Panvel Daily Paper