पनवेल : वार्ताहर
इंटर डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (आयडीइएसए)द्वारा आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेत अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी संघाने 10हून अधिक क्रीडाप्रकारांत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
आयडीइएसएच्या क्रीडा स्पर्धांचे भारती विद्यापीठ खारघर, शांतिनिकेतन पॉलिटेक्निक पनवेल, पिल्लई तंत्रनिकेतन रसायनी, बी. एल. पाटील पॉलिटेक्निक खोपोली आदी तंत्रनिकेतन संस्थांमध्ये आयोजन करण्यात आले. कालसेकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी संघाने तब्बल 18हून अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.
सीझन क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, लाँग जम्प, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, रेस्टलिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांत कालसेकर पॉलिटेक्निकच्या संघाने प्रथम; तर डिस्क थ्रो या क्रीडा प्रकारात द्वितीय पुरस्कार पटकावून यश संपादन केले. शैक्षणिक तसेच शिक्षणपूरक उपक्रमांमध्ये सदैव अग्रणी असणार्या कालसेकर पॉलिटेक्निकच्या संघाने यापूर्वीही अनेक स्पर्धांत सुयश संपादन केले आहे.
या यशाबद्दल अंजुमन-ए-इस्लाम नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुरहान हारिस, कालसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटागी, महाविद्यालयाचे प्राचार्य रमजान खाटीक, महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक झहिरूद्दीन खतीब, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.