अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा अख्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादित असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरीसुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.
भाषेवर बोलताना काही लोक व्यासपीठावरून म्हणतात, ‘आमची भाषा शुध्द आहे.’ (म्हणजे त्यांना म्हणायचं असतं की आमच्या परिसरातली भाषा सोडून बाकीच्या भाषा अशुध्द आहेत.) पण भाषेत तसं शुध्द आणि अशुध्द काही नसतं. तसं पाहायला गेलं तर आजची जी जागतिक भाषा इंग्रजी आहे तीसुध्दा (अशा लोकांना अभिप्रेत असल्यासारखी) शुध्द नाही. असंच कोणीतरी अहिराणी भाषक म्हणत असतात, ‘मराठी लोकांना अहिराणी भाषा कळत नाही.’ पण असं नाही. अहिराणी भाषा वाचायला वा ऐकून समजून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागतो हे खरं. मराठी माणसाला अहिराणी भाषा कळते आणि बाहेर सगळ्या महाराष्ट्रातही कळते. अहिराणी भाषेची सर्वत्र दखलसुध्दा घेतली जाते. फक्त काम चांगलं असायला हवं.
दोन जणांना एकमेकांशी बोललेलं कळलं की झाली भाषा तयार. मग तु्म्ही तिला कोणतंही नाव द्या. तिला नाव दिलं नाही तरी कोणत्याही भाषेचं काहीच अडत नाही. मग अशा भाषा त्या त्या लोकांच्या गटांचं, जातीपातीचं नाव लावून लोकजीवनात तग धरून राहतात. अहिर लोकांची अहिराणी भाषाही खान्देशात अशीच तयार झाली. आजूबाजूचे लोकजीवन म्हणजे लोकांचं रोजचं जगणं, हे जगणं भाषेत आलं आणि अहिराणी भाषा तयार झाली.
मनुष्य इथून तिथून जसा एक नाही, जमीन इथून तिथून जशी एक नाही, बाहेरची हवा-वातावरण इथून तिथून जसं एक नाही, तशा भाषाही इथून तिथून एक नाहीत. याच्या पुढेही जगाची एकच एक भाषा होऊ शकत नाही आणि यापुढे समजा कोणी कितीही तसं करायचं ठरवलं तरी ते व्यवहारिक होणार नाही. तरीही अख्ख्या जगात आज आपल्या स्वत:च्या भाषा बोलायला जे जे लोक लाजतात, त्या त्या भाषा मरायला सुरुवात झाली आहे. अशा अनेक भाषा आजपर्यंत मेल्या ज्याचा आपल्याला पत्ताही लागला नाही.
जसं लोकजीवन असतं तशी भाषा असते. लोकजीवनात ज्या ज्या जिनसा-वस्तू असतात, जी जी झाडं झुडपं असतात, जमीन, पाणी, हवा, पीकपाणी असतात, त्यामधून लोकजीवनात लोकपरंपरा, लोकगीतं, लोक वाड्मय, लोक म्हणी, लोकनाच, लोक हुंकार, लोक परिमाणं, लोक व्यवहार, लोकवास्तू, लोकवस्तू, लोक हत्यारं आदी तयार होतात आणि या सगळ्यांतून आपोआप स्थानिक भाषा तयार होत असतात. संस्कृतमधून मराठी आणि मराठीतून अहिराणी अशी जी आजपर्यंत आपल्याला कोणी अहिराणी भाषेची उत्पत्ती-व्युत्पत्ती सांगत होतं ती चूक आहे असं आतापर्यंत उलटं संशोधन होत आहे. अहिराणीची तशी उत्पत्ती नाही. बोलीभाषांमधून प्रमाण भाषा तयार होतात. प्रमाण भाषेपासून बोली तयार होणार नाही. कोणत्याही भाषांत इतर भाषेतील शब्द येणं साहजिक आहे. काही टक्के दुसर्या भाषेतील शब्द बोलीत दिसतात म्हणून ती भाषा अमूक एका प्रमाण भाषेपासून तयार झाली, असं म्हणणं म्हणजे वडाचं पान पिंपळाला लावण्यासारखं आहे.
-डॉ. सुधीर रा. देवरे