सांग कसो दिसतो खंडाळ्याचो घाट, असे वर्णन कवींनी खंडाळा बोरघाटाचे केले आहे. सुंदर, देखणा नेत्रांना सुखावणारा खंडाळा घाट सध्या अपघातांच्या मालिकांनी पुन्हा चर्चेत आला आहे. हे अपघात निव्वळ मानवी चुका व यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच घडल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. युती शासनाने 2001मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार केला. त्याअगोदर मुंबई-पुणे या महानगरांना जोडणारा जुना महामार्ग क्रमांक 4 पनवेल चौक, खोपोली आणि खंडाळा घाट करून खंडाळा, लोणावळा, कामशेत असा पुण्याकडे जात असे. या मार्गात खंडाळा घाटातील अवघड वळणे व वाहनांची मोठी वर्दळ यामुळे घाट नेहमीच जाम असल्याचे चित्र होते.
घाटामध्ये कधीकाळी वाहने ब्रेक डाऊन, नादुरुस्त झाल्यास हा घाट दोन-दोन दिवस बंद राहिल्याचे अनेक वेळा अनुभवास आले आहे. अपघात घडल्यास वाहनांमधील प्रवासी व वाहनचालकांना मदत करणेही जिकिरीचे होत असे. ही समस्या द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीने सुटल्याने खोपोलीकडून जुन्या महामार्गाने येणार्या वाहनांची संख्या कमी झाली. असे असताना सध्या खंडाळा घाटात अपघाताच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बोरघाटातील मुंबई-पुणे महामार्गावरील अंडा पॉइंट हा अपघातग्रस्त ठिकाण म्हणून कुलौकिक झाला होता. या ठिकाणी प्रत्येक महिन्यात सरासरी किमान 20 अपघात घडले आहेत. या घटनांत वाहनचालक व प्रवासी असे किमान 58 लोक ठार झाल्याची, तर 80च्या आसपास जबर जखमी वा कायमस्वरूपी जायबंदी झाल्याची पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे. 2004मध्ये तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून अंडा पॉइंटवरील वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देत येथील वाहतूक दुसर्या मार्गावरून वळविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अंडा पॉइंटवर क्वचितच अप्रिय घटना घडल्या आहेत.
तब्बल 12 ते 15 वर्षांनंतर अंडा पॉइंटच्या परिसरात अपघात घडत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. लोणावळा, खंडाळा जुन्या महामार्गाने खोपोलीत येत असताना अंडा पॉइंटअगोदर असणारे गारमाळ रस्ता परिसरात तसेच शिंग्रोबा मंदिराच्या वळणाजवळ प्रवासी वाहतूक करणार्या बसेसना अपघात घडत आहेत. या घटनांना वाहनचालक जसे जबाबदार आहेत तसेच पोलीस यंत्रणांचा दुर्लक्षपणा तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसेसच्या लागेबंधांचा परिणाम असल्याचे विदारक चित्र आहे. विशेष बाब म्हणजे बोरघाटातील अमृतांजन ब्रिजच्या परिसरातील तीव्र वळणाजवळ रात्री
बारानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक खोळंबा झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तीव्र चढ व वळणाचा गैरफायदा घेत वाहन दुरुस्तीच्या नावाखाली उभे असणारे मॅकॅनिक, कारागीर व बंद पडलेल्या वाहनाला खेचून नेणारी टोइंग वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवत असल्याने अवजड वाहनांचा मौसम कट होऊन ही वाहने बंद पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचवेळी वाहने बंद पडल्याचा व खेचून देण्याचा दुहेरी भुर्दंड, खर्च वाहनचालकांवर पडत आहे. वाहन दुरुस्ती करणार्या कारागिरांना तसेच टोइंग वाहनांना या ठिकाणी नेहमीच मोठा धंदा मिळत असल्याने कारागिरांचा व पोलिसांचाही अर्थपूर्ण सुसंवाद असल्याची कुजबूज आहे. हे होत असताना या ठिकाणी नेहमीच वाहनांची अर्धा ते एक किमी रांग लागून राहते.
असे झाले की पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने खंडाळा घाटातून खंडाळा मार्गे दस्तुरी वनविभाग, विश्रांतीगृह, गारमाळ रोड, अंडा पॉइंट शिंग्रोबा मंदिराच्या जवळून खोपोलीत उतरत असतात आणि याच मार्गावर सध्या नेहमीच अपघात घडत असल्याचे वास्तव आहे, तर दुसरी बाब म्हणजे खासगी प्रवासी वाहतूक करणार्या ट्रॅव्हल्स द्रुतगती महामार्गचा टोल वाचवण्यासाठी चौक, खोपोली, खंडाळा घाट असा मार्ग निवडून पुण्याकडे जाणार्या बसेसची संख्या दिवसेंदिवस शंभराहून अधिक होत असताना रात्री पोलिसांकडून या गाड्यांच्या नंबर प्लेटवर बॅटरीचा फोकस मारून सांकेतिक बोलीभाषा केली जात असल्याची तसेच बसना बोरघाटातून जाण्यासाठी ठरावीक कोड देऊन महिन्याची वसुली केली जात असल्याची चर्चाही आहे.
आठ दिवसांपूर्वी खासगी बस खोपोलीकडे नो एण्ट्रीमधून येत असताना पाच प्रवासी ठार, तर 39 प्रवासी जखमी झाले होते. घटनेची दखल घेऊन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजितसिंह पाटील व तहसीलदार चप्पलवार यांनी या ठिकाणी येणार्या वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते, परंतु काही दिवस उलटत नाहीत तोच येथील व्यवस्था पाहणार्या कर्मचार्यांनी या वाहनांकडे पुन्हा दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांची व बोरघाटातील यंत्रणा यांचे कुठेतरी लागेबांधे आहेत का, अशीही चर्चा रंगली आहे.
27 मे 2019 सकाळी 10ची. वेळ. नवी मुंबई वाशी येथील खासगी कंपनीचे कर्मचारी सिद्धेश्वर ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने लोणावळा येथे व तिथून पंढरपूरकडे जात असताना एमएच 4 एफके 201 क्रमांकाच्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र वळणावर बसच्या इंजीनचा जोर कमी होत ब्रेक निकामी झाल्याने ही बस 20 फूट मागे येत रस्त्याच्या बाजूला लावलेले संरक्षण लोखंडी बॅरिकेट्स तोडून 200 फूट दरीत कोसळता कोसळता वाचली. पाठीमागे असणार्या आंब्याच्या झाडाला बसचा पाठीमागील भाग अडून बस थोडक्यात वाचली. एकूण 35 प्रवासी या आंब्याच्या झाडामुळे बालंबाल बचावले. 5 ऑक्टोबर 2018 रोजी खुली शिळफाटा येथील जैनधर्मीय भाविक बाफळ येथे तीर्थस्थळ दर्शन करून परतत असताना शिंग्रोबा मंदिर परिसरात अशीच घटना घडली. सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कुठलीही अप्रिय घटना घडली नव्हती. 19 मार्च 2017 रोजी पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांची सहल खोपोली गगनगिरी आश्रम महड व पाली येथे दर्शनासाठी जुन्या मार्गाने येत होती. शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र उतारावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने सावरीच्या झाडावर जाऊन आदळल्याने अनेकांचे प्राण वाचले होते. अनंत दिगंबर जांबरे, सुलभा गी. ओक, वंदना देशमाने, सदानंद सोनवणे, महादेव देशमुख, सरस्वती गायकवाड, आनंदा गायकवाड, मान्ग्लाकादाम, जयश्री मारणे, सुषमा गरवारे, गीता चांद्रेगा, प्रहावती नांदे, शकुंतला सस्ते, संग्राम केंद्रे, वसंत आंबिले असे जखमी झाले होते.
काही दिवसांपूर्वी अशाच घटनेत वाहन झाडावर जाऊन अडकले होते. पाणी आणि फुले नसलेले किंबहुना थोडेसे विद्रुप दिसणार्या या झाडाने अनेकांचे प्राण वाचवण्याचे अनमोल काम केल्याने खोपोलीतील सामाजिक संस्थांनी मी एक झाड आणि मी अनेकांचे प्राण वाचवलेत, तुम्ही तर जाणती माणसे माझ्यासारखी अनेक झाडे वाचू शकता, आम्ही वाचलो तर तुम्ही वाचाल, झाडे जगवा, झाडे वाचवा, असा संदेश देणार्या फलकाचे अनावरण झाडावर केले होते. 20 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 2 वा. सुमारास शेवगाव-मुंबई एसटी बस लोणावळा बसस्थानकातून प्रवासी घेऊन मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून खंडाळा वाघजाई मंदिर मार्गाने खोपोलीकडे येत असताना वनविभाग चौकीजवळील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली होती.
या अपघातात 10 प्रवासी जखमी झाल्याने खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. मुंबई-पुणे महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरू असून दर आठवड्याला एखादा अपघात होत असल्याचे समोर येत आहे. श्रेयस कांबळे, वरद कांबळे, सतीश गीते, ज्योती सतीश गीते, देविदास गजभूर, छाया देविदास गजपूर, ज्ञानेश्वर यादव, अंबादास गायकवाड, हिंदूराव सरडे, शिवाजी मुळे, लक्ष्मण अंजली हे जखमी होते. 28 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबई-पुणे जुन्या मार्गावर खोपोली बायपास मार्गावरून वडूज-परळ मुंबई बस क्रमांक एमएच 14 बीटी 4330 राज्य परिवहन महामंडळाची बस खोपोलीत येत असताना समोरून येणार्या मालवाहू ट्रकला ठोकल्याने नऊ जण जखमी झाल्याने खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बसचालक पी. व्ही. थोरात, प्रवासी राजेंद्र कदम, शारदा राजेंद्र कदम, प्रशांत थोरात, विष्णू चव्हाण, जगन्नाथ हिंगे, अरविंद भोसले, रंजना जगन्नाथ हिंगे यांना दुखापत झाली होती.
-अरूण नलावडे, फिरस्ती