नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएलच्या 14व्या पर्वाचे उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्न करताना दिसत आहे. हे 31 सामने न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती (यूएइ) येथे आयपीएलच्या दुसर्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील यूएइवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो निश्चित झाली आहे. 29 मे रोजी होणार्या विशेष सर्वसाधारण सभेत याबाबत घोषणा होणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय संघ 2 जूनला इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. तेथे 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने ही मालिका जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू करावी, असा प्रस्ताव इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडे (इसीबी) ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यात आता नवा प्रस्ताव समोर येत आहे. दुसर्या व तिसर्या कसोटीत नऊ दिवसांचा कालावधी आहे आणि तो कमी करून तिसरी व पुढील दोन कसोटी सामने आधी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने तयार केला आहे, जेणेकरून आयपीएलच्या दुसर्या टप्प्यासाठी पाच अतिरिक्त दिवस मिळतील.
खेळाडूंची होणार दमछाक!
बीसीसीआय इसीबीकडे अतिरिक्त पाच दिवसांचा प्रस्ताव ठेवणार आहे, जेणेकरून ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपसाठी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकते. 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप होणे अपेक्षित आहे. आयसीसीही वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी यूएइचाच विचार करीत आहे आणि आयपीएलच्या दुसर्या टप्प्यामुळे खेळाडूंचा त्यासाठी चांगला सराव होऊन जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे, पण या सर्वांत खेळाडूंची दमछाक होणे हे निश्चित आहे.