Breaking News

भारताचा बांगलादेशवर डावाने विजय

इंदूर : वृत्तसंस्था

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. फलंदाजी करणार्‍या पाहुण्या बांगलादेश संघाने भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर पहिल्याच दिवशी शस्त्रे खाली ठेवली. अवघ्या 150 धावांतच बांगलादेशचा संघ गारद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. मग पुन्हा फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या दुसर्‍या डावाची सुरुवातही अडखळत झाली. 72 धावांवरच बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. इम्रउल कायेस, शदमन इस्लाम, मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन, महमुदुल्लाह हे बाद झाले होते. मुशफिकुर रहीमने दुसर्‍या डावातही 64 धावा करून कसोटी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अडथळा आर. अश्विनने दूर केला. भारताच्या भेदक मार्‍यासमोर बांगलादेशची अंतिम फळी मैदानावर फार काळ तग धरू शकली नाही आणि त्यांचा डाव 213 धावांवर आटोपला. भारताकडून दुसर्‍या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक चार गडी बाद केले, तर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply