Breaking News

तातडीने पंचनामे करावेत

भाताबरोबर नाचणी, वरी, भाजीपाला शेतीचे नुकसान

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांची सर्व प्रकारची शेती सरत्या पावसाने नुकसानीच्या खाईत गेली आहे. भात, नाचणी आणि वरी पिकांचे तसेच भाजीपाल्याचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. आदिवासी भागातील शेतकरी प्रामुख्याने भाताबरोबर मोकळ्या माळरानावर नाचणी आणि वरीची शेती करतात. त्याच वेळी  हे आदिवासी शेतकरी भाजीपाला शेती करून पिकविलेला भाजीपाला बाजारात नेऊन त्यावर मिळणार्‍या तुटपुंज्या कमाईवर आपले कुटुंब चालवतात. यावर्षी सतत सुरू असलेल्या पावसाने शेतकर्‍यांची मोठी कोंडी केली आहे. त्यात आता कोसळलेल्या सरत्या पावसाने उभी पिके जमिनीला खिळून बसली आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. पुढील आठ महिने कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आदिवासी शेतकर्‍यांवर आलेले संकट लक्षात घेऊन आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी आदिवासी भागातील शेतकर्‍यांना आपल्या भात, नाचणी, वरी आणि भाजीपाला यांच्या नुकसानीबद्दल 100 टक्के नुकसानभरपाई मिळावी म्हणून आदिवासी संघटनेच्या वतीने अध्यक्ष भरत शिद, उपाध्यक्ष परशुराम दरवडा, सचिव मोतीराम पादिर, सहसचिव दत्तात्रय हिंदोळा, तसेच विलास भला, अनंता वाघ यांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांना भेटून निवेदने दिली. निवेदनात आदिवासी संघटनेने आदिवासींना 100 टक्के भरपाई आणि तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी विलास भला, अनंता वाघ यांच्यासह आदिवासी शेतकरी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply