पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड शटलर्स बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने इन हाऊस बॅडमिंटन टुर्नामेंट 2019चे आयोजन नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र भगत, सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण तसेच योगेश पाटील उपस्थित होते.
पनवेल तालुका क्रीडा संकुल तसेच सीकेटी विद्यालयात बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थी खेळाडूंसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचे वयानुसार गट न बनवता त्यांच्या खेळाच्या शैलीनुसार सहा गट तयार करण्यात आले. नवोदित मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्यात हाफ कोर्ट स्पर्धा खेळविण्यात आली.
विजेत्या खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मनोगतात विजेत्यांचे अभिनंदन केले व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी आनंद स्पोर्ट्स पनवेल व प्रदीप स्पोर्ट्स कळंबोली यांचे सहकार्य लाभले.