कोलकाता : वृत्तसंस्था
कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत 2-1ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असा विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.
भारताने बांगलादेशवर एक डाव आणि 46 धावांनी मात केली. पहिला डाव 347 धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने 195 धावांवर संपवला. या विजयासह भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सामने डावाने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.
दुसर्या डावातही भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. उमेश यादवने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला, तर त्याला इशांत शर्माने चार बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही.
दुसर्या दिवसाच्याी अखेरीस भारताने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले होते, पण मुश्फिकुर रहिमने मैदानात थोडावेळ तग धरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलं दाज झटपट माघारी परतले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भारतीय संघाचे ‘सत्ते पे सत्ता’
इंदूर कसोटी सामन्यात डावाने बाजी मारल्यानंतर ऐतिहासिक कोलकाता कसोटी सामन्यातही भारताने एक डाव आणि 46 धावांनी बाजी मारत मालिकेत 2-0ने निर्भेळ यश संपादन केले. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग चार सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे. याआधी 2013 साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग सहा विजयांची नोंद केली होती. 2019 वर्षातील भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळणार आहे.
विराट कोहली मानाच्या पंगतीत
आपला पहिला दिवस-रात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणार्या विराट कोहलीने शतकाची नोंद करीत अनेक विक्रमांची नोंद केली. या विजयासह विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज कर्णधारांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणार्या कर्णधारांच्या यादीत विराट सध्या 33 विजयांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने या सामन्यात कसोटी कारकीर्दीतील 27वे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हे त्याचे 20वे शतक ठरले आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके ठोकणार्यांच्या यादीत विराट आता दुसर्या क्रमांकावर आहे. अग्रस्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (25) आहे.