Breaking News

पनवेलमध्ये युवा पिढी महत्त्वाचा फॅक्टर

पनवेल ः बातमीदार

सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच प्रत्येक जण मतदान करण्याचे महत्त्व जाणून घेत आहे व दुसर्‍याला मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान होईल, हे निश्चित. पनवेलमध्ये 18 ते 39 वर्षापर्यंत दोन लाख 73 हजार 424 मतदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युवा पिढी हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे.

मतदान हा आपला हक्क आहे आणि यात युवा पिढी सर्वांत आघाडीवर आहे. युवा पिढीने ठरवले, तर संपूर्ण राजकारणच बदलून टाकू शकतो. त्यामुळे या निवडणुकीत युवा पिढी महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. याविषयी तरुणांशी चर्चा केली असता असे दिसून आले की, गेल्या वेळेपेक्षा या निवडणुकीत युवा वर्ग मतदानामध्ये सहभाग घेत आहे.

सध्या सगळीकडेच मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही, सोशल मीडियावर मतदानाच्या बाबतीत जनजागृती होत आहे, तसेच विविध कार्यक्रम, पथनाट्यातून प्रबोधन होत आहे. त्यामुळे युवापिढी मतदानाच्या बाबतीत जागरूक झाली आहे. नवीन मतदार नोंदणी अभियान राबविल्यामुळे नवीन मतदारांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 18 ते 39 वर्षापर्यंत दोन लाख 73 हजार 424 मतदार, तर 40 वर्ष ते 100 वर्षाच्या पुढे दोन लाख 83 हजार 900 मतदार; असे एकूण पाच लाख 57 हजार 324 मतदार आहेत. 100 वर्षांपेक्षा अधिक मतदारांची संख्या पनवेलमध्ये 242 आहे. पनवेलमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात येत आहे.

तरुण पिढीने मतदान करणे खूप गरजेचे आहे. खास करून तरुण वर्गाने लक्ष देऊन मतदान विषयक जनजागृती करायला हवी.

-धीरज भोपी, हरिग्राम

युवा वर्ग जर जागृत झाला तर नक्कीच भ्रष्ट राजकारण्यांना घरी बसवतील व नवीन आधुनिक विचार असलेले उमेदवार निवडून देतील.

-पंकज तांबडे, नेरेपाडा

मतदान करा, फरक पडतोच. महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कारण युवा पिढी देशाच्या राजकारणात सहभागी झाली आहे. आजच्या तरुण वर्गाला विकास हवा आहे.

-संदीप भगत, तक्का, पनवेल

जास्त मतदान झाल्यामुळे योग्य पात्रता असलेल्या उमेदवाराला निवडून आणू शकतो. त्यामुळे नव्या पिढीला एक योग्य शासन मिळेल. या सर्वांचा फायदा पुढे जनतेला होणार आहे.

-हरेश दिवकर, नवीन पनवेल

जो आम्हाला प्रगतीच्या वाटेवर नेईल, समाज सुधारेल त्यालाच आम्ही निवडून देऊ.

-सुरेंद्र आंबेकर, आकुर्ली

जनतेने डोळे उघडे ठेवून मतदान करायला हवे. पैसे देऊन आपल्याला विकत घेणार्‍या पक्षाविरोधात मतदान केल्यानेच या प्रकाराला आळा बसायला मदत होईल.

-विलास मोरे, नवीन पनवेल

स्वच्छ चारित्र्याच्या सामाजिक कार्याची आवड असलेल्या उमेदवाराची निवड व्हायला हवी. त्यामुळे मी या गोष्टी असणार्‍या उमेदवारालाच मत देईन.

-निकेश रोडपालकर, नेरेपाडा

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply