Breaking News

महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्रच!

फडणवीस सलग दुसर्‍यांदा बनले मुख्यमंत्री

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार असताना शनिवारी (दि. 23) भल्या पहाटे राज्यात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस व पवार यांना शपथ दिली.

बहुमतासाठी आठ दिवसांची मुदत

मुंबई : मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… असे म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

राज्याच्या विधानसभेत 288 जागा असून, बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 हा जादुई आकडा आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत, तसेच भाजपला अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे नव्या सरकारचे सत्तेचे गणित जुळून येण्याची चिन्हे आहेत.

शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार : मुख्यमंत्री

आपली बांधिलकी ही महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. हे सरकार महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकर्‍यांसाठी काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ’मोदीजी है तो मुमकीन है’ अशी घोषणाही त्यांनी दिली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी हिंदुत्व सोडले, छत्रपती शिवाजी महाराजांना सोडले. राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांचा विचार केला नाही. शिवसेनेच्या या आततायीपणाला शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार आहेत. राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करीत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील सत्ताकारणाला लागलेल्या नाट्यमय वळणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, 24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. त्यानंतर जनतेची ही अपेक्षा होती की, जनतेने दिलेल्या जनादेशाचा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आदर करावा, पण शिवसेनेने पहिल्या दिवसापासून सर्व पर्याय खुले असल्याची भाषा केली. 29 ऑक्टोबरला आमची पहिली बैठक होती तीही रद्द केली. शिवसेना पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास उत्सुकच नव्हती, मात्र राष्ट्रवादीसोबत बैठकांवर बैठका घेत होते. भारतीय जनता पक्षाला त्यांना भेटायला वेळ नव्हता, पण इतर सर्वांना भेटण्यासाठी वेळ होता. राज्यातील जनतेने हा खेळ पाहिला. शेवटी भाजपने सर्वाधिक जागा असूनही सरकार स्थापण्यास आपण असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितले.

या वेळी पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. राऊतांच्या तोंडात पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. खंजीर त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खुपसला आहे. त्यासाठी शिवसैनिक त्यांना माफ करणार नाहीत.

त्यांनी किती टोकाची भाषा गेल्या महिनाभरात केली, ते राज्यातील जनता पाहात होती. आम्ही ‘मातोश्री’ची गरिमा राखली. आमचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला ‘मातोश्री’ला जात होते, पण उद्धवजींना ‘मातोश्री’ सोडून ‘सिल्व्हर ओक’ हे शरद पवारांचे निवासस्थान गाठावे लागले. तेही एकवेळ ठीक होते, पण त्यांना हॉटेलमध्ये जावे लागले. ही वेळ राऊतांनी शिवसेनेवर आणली, अशा शब्दांत पाटील यांनी राऊतांवर टीका केली.

’मी मुंबईचा आहे. बाळासाहेबांचे मुंबईसाठी योगदान मोठे होते, आम्ही ते कधीच नाकारले नाही. म्हणून शिवसेनेने जनादेशाचा आदर राखावा असे आम्हाला वाटत होते. राज्यातील 80 टक्के जनता अवकाळी पावसाने त्रस्त आहे, पण तिला वार्‍यावर सोडून शिवसेनेला आपला हट्ट सोडायचा नव्हता. राज्यातल्या जनतेचे मत होते की, भाजपने सरकार स्थापन करायला हवे. अगदी रस्त्यावरच्या भाजीवाली, रिक्षावाल्यापासून प्रत्येकाला हे वाटत होते. त्यामुळे आम्ही हे सरकार स्थापन केले,’ पाटील म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply