पनवेल : वार्ताहर, बातमीदार
रोडपाली परिसरातील आदिवासींना महावितरणच्या अधिकार्यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमानित होईल, अशी कृती करीत शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला असून, या विरोधात संबंधित अधिकार्यांवर कारवाई करीत आदिवासींची माफी मागावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेल येथील भिंगारी कार्यालयाच्या बाहेर गुरुवारी (दि. 28) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी जिल्हा सरचिटणीस बळीराम कातकरी, तालुका उपाध्यक्ष हिरामण नाईक, कचरू कातकरी, गणपत वारगडा, कुंदा पवार, योगिता दुर्गे, राम नाईक, अनसूया वाघे, बाळू वाघे यांच्यासह आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पनवेल खालापूर कर्जत, सुधागड, उरण तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी कातकरी, ठाकूर कुटुंब आदींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासींचे रेशनिंग प्रश्न, विकास योजना, घराखालील जमीन, शिक्षण, अत्याचार, इतर प्रश्नावर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे.
यासाठी आदिवासींना आपल्या हक्कासाठी शासनाच्या अधिकार्यांबरोबर भांडावे लागते. कळंबोली येथील महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता रामेश्वर घुमे यांच्याकडे रोडपाली फुडलँड परिसरातील आदिवासी आपल्या विजेच्या समस्या घेऊन गेले होते. या ठिकाणी महावितरण विभागाने आदिवासी योजनेखाली ट्रान्सफॉर्मर बसविलेला आहे, मात्र या ट्रान्सफॉर्मवरवरून जवळच असलेल्या काही परप्रांतीयांना वीजजोडणी दिली गेलेली आहे. त्यांची वीजजोडणी तत्काळ खंडित करण्यात यावी, यासाठी आदिवासींनी घुमे यांची भेट घेतली. या वेळी घुमे यांनी याच आदिवासींना सार्वजनिक ठिकाणी अपमानीत होईल अशी कृती करीत शिवीगाळ केली गेल्याचा आरोप आदिवासीनी केला आहे. या विरोधात श्रमजीव संघटना महाराष्ट्र यांच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी पनवेल भिंगरी येथील कार्यालयावर आदिवासी एकदिवसीय धरणे आंदोलन करीत घुमे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करावी. सेवा पुस्तकेवर ना बढतीचा शेरा मारण्यात यावा. वीजबिल रीडिंगप्रमाणे द्यावे, अशी मागणी या धरणे आंदोलनात करण्यात आली होती.