नवी मुंबई : सिडको वृत्त
गृहनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असणार्या सिडको महामंडळाने नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उन्नती गृहनिर्माण योजनांतील उर्वरित 76 घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करते वेळी काढले. गुरुवारी (दि. 28) सिडको भवन येथे वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती गृहनिर्माण योजनांतील उर्वरित 76 घरांच्या अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी सिडकोतील सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, अशोक शिनगारे यांच्यासह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गृहनिर्माण योजनांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 45; तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 31 अशी एकूण 76 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन योजनेतील घरे ही 1 आरके, 1 बीएचके आणि 2 बीएचके, तर उन्नती गृहनिर्माण योजनेतली घरे ही 1 आरके व 1 बीएचके प्रकारातील आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन हे खारघरच्या निसर्गरम्य परिसरात विकसित करण्यात आलेले गृहसंकुल आहे. या गृहसंकुलापासून खारघर रेल्वे स्थानक हे नजीकच्या अंतरावर असून हा परिसर सर्व प्रकारच्या नागरी सोयीसुविधांनी युक्त आहे. उन्नती गृहसंकुल हे सद्यस्थितीत नवी मुंबईतील सर्वांत वेगाने विकसित होणार्या उलवे नोड्मध्ये असून नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी रेल्वे स्थानकापासून नजीकच्या अंतरावर आहे. उन्नती गृहसंकुल परिसर हा जेएनपीटीसह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्ग आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील प्रस्तावित तरघर रेल्वेस्थानक येथून नजीकच्या अंतरावर आहे. या गृहनिर्माण योजनेशी संबंधित विविध प्रक्रिया, जसे अर्ज नोंदणी, शुल्क भरणा, सोडत इ. या ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. ऑनलाइन प्रक्रियेमुळे एकंदर सर्व प्रक्रिया या पारदर्शक, जलद व सुलभरित्या पार पडणार आहेत. तसेच अर्जदारांचा वेळही वाचणार आहे.