Breaking News

दिव्यांगांचे तहसील कार्यालयावर उपोषण

उरण : वार्ताहर

येथील तहसील कार्यालय आणि उरण तालुक्यतील सर्व दिव्यांग बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्या वेळी तत्कालिन तहसीलदार कल्पना गोडे उपस्थित होत्या. दिव्यांगांची आरोग्य तपासणी झाल्यावर जुने दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांगांकडून घेण्यात आले व नवीन प्रमाणपत्र देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. नऊ महिने झाले, परंतु अजूनही दिव्यांगांना नवीन प्रमाणपत्र देण्यात आले नाही. याविषयी अनेक वेळा तहसीलदार व रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना विचारले असता, आमच्याकडील संगणक खराब झाले आहे. ते दुरुस्त झाल्यानंतर देऊ, असे सांगितले जाते. दिव्यांगांकडील जुने दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात जमा करून घेतल्याने व नवीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिव्यांगांना सवलतीसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. एक आठवड्यात दिव्यांगांना नवीन दिव्यांग प्रमाणपत्र न मिळाल्यास मंगळवारी (दि 3) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उरण तहसील कार्यालयासमोर उरण तालुक्यातील दिव्यांग उपोषण करणार आहेत, असा इशारा माऊली अपंग संघटनेने दिला आहे. त्याचप्रमाणे लवकरच नवीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे याविषयी पत्र माऊली अपंंग संघटनेने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना सोमवारी (दि. 25) दिले. या वेळी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, माऊली अपंग संघटना खोपटे संस्थापक महादेव पाटील, अध्यक्ष विजय पाटील, प्रतीक्षा प्रवीण घरत, महेंद्र नामदेव म्हात्रे, प्रकाश हिराजी कोळी, मढवी सर आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply