नागोठणे : प्रतिनिधी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काही वेळा कुलूप लावले जाते. हा विषय माझ्या कानावर आला असून लवकरच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना येथे आणून त्यांच्या समवेत या ठिकाणी चर्चा करणार असल्याची स्पष्टोक्ती आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने नागोठणे आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच कर्मचार्यांनी जागृत असणे अपेक्षित आहे, मात्र मागील रविवारी अपघातातील गंभीर रुग्णाला या ठिकाणी आणले असताना या केंद्राला टाळे लावले असल्याचे उघडकीस आले होते, तर कामाच्या दिवशी वैद्यकीय अधिकार्यांच्या दालनालासुद्धा काही वेळेस दुपारच्या दरम्यान कुलूप लावले जाते, असे स्पष्ट होत आहे. ही गंभीर बाब आमदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणार असून यासंदर्भात लवकरच येथे बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले.