परतीचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल
कर्जत : बातमीदार – परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. हा अवकाळी पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
मुसळधार पर्जन्यवृष्टी होणारा कर्जत तालुका भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लहान-मोठी जमीन बाळगणार्या प्रत्येक शेतकर्याचे भात हे प्रमुख पीक आहे. त्याचबरोबर येथील शेतकरी नाचणी, वरी, भुईमूग, तीळ, उडीद या पिकांचेदेखील उत्पादन घेतात. यंदा भात पीक चांगले आल्याने बळीराजा सुखावला असतानाच परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे नुकसान करून बळीराजाला संकटात टाकले आहे.
पिक काढणीस सुरूवात होत असतानाच परतीच्या पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले आहे. तालुक्यातील लोभेवाडी येथील कृष्णा नागो लोभी या आदिवासी शेतकर्यांने दिड एकरवर भात पिकाची लागवड केली होती. या शेतकर्यांचा प्रपंच या भातशेतीच्या पिकावर अवलंबून आहे. परतीच्या पावसाने या शेतकर्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात कोविड संकटामुळे रोजगार उपलब्ध नसल्याने या शेतकर्यांनी काय करावे आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवावा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना, निसर्ग चक्रिवादळ आणि आता परतीचा पाऊस यामुळे बळीराजावर संकटाचे डोंगर उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत मायबाप सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा चंद्रकांत ऐनकर यांच्याकडून व्यक्त होत आहे.