सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे महापौरपद भाजपने राखले आहे. सत्ताधारी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बुधवारी (दि. 4) महापौरपदी निवड झाली. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल, असा दावा केला होता, मात्र भाजपने बाजी मारल्याने या आघाडीचा प्रयोग फसल्याचे चित्र आहे.
सोलापूर महापालिकेत भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी एमआयएमच्या शाहजादीबानो शेख यांचा 51 विरुद्ध आठ मतांनी पराभव केला. नूतन महापौर श्रीकांचना यन्नम या विणकर समाजाच्या आठव्या आणि पहिल्याच महिला महापौर ठरल्या आहेत.
महापौर निवडीच्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसप आदी पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला महापौर निवडून आणणे सहज सोपे झाले. आश्चर्य म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व बसपच्या स्वाती आवळे यांनीही भाजपला मतदान केले. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी गठीत करून सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न फसला आहे.