Monday , January 30 2023
Breaking News

महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र व राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच महाविद्यालयामध्ये झाले. या चर्चासत्रामध्ये न्यूझीलंड, इंडोनेशिया व फिलिपिन्स या देशांतून सहा वक्ते आले होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रामध्ये ‘मानसशास्त्र व राज्यशास्त्र व सामाजिक शांतता’ या विषयावर परिसंवाद घडून आला. या चर्चासत्रासाठी राज्यभरातून अनेक विद्वान अभ्यासक व्यक्तींनी उपस्थिती दर्शवून आपले वैचारिक शोधनिबंध सादर केले. अत्यंत यशस्वीपणे झालेल्या या चर्चासत्रामध्ये इंडोनेशिया, जकार्ता येथील वक्ते प्रा. डॉ. अहमद दिवान व इंडोनेशिया येथील इस्लामिक स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ. युफी आंद्रीयानो यांनी मानसशास्त्र व मानसिक शांतता यातील संबंध स्पष्ट करीत मानसशास्त्राचे महत्त्व विषद केले, तर फिलिपिन्स येथील मानसशास्त्राचे प्रा. डॉ. आर्जेल मसांडा यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये आनंदी राहण्याचा कानमंत्र उपस्थितांना दिला व उपस्थितांची दाद मिळविली. न्यूझीलंडमधील ऑकलंड विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. चेरील टर्नर व  डॉ. जेड सोफिया लीग्रीस यांनी न्यूझीलंड येथील लोकजीवन तसेच माओरी या जमातीची जडणघडण स्पष्ट करीत या जमातीमधील रूढी, परंपरा, चालीरीती, त्यांचे सण, उत्सव याबाबतची माहिती दिली. या जमातीमधील स्त्रियांचा धाडसीपणा व समाजविकासातील त्यांचे योगदान आदी विषयांची माहिती सखोलपणे मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करीत त्यांचा परिचय करून दिला व महात्मा फुले महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर होणार्‍या प्रगतीचा आलेख पाहुण्यांसमोर सादर केला. चर्चासत्राच्या शेवटी निरोप समारंभामध्ये उत्कृष्ट शोधनिबंध सादर केल्याबद्दल डॉ. यशवंत उलवेकर यांना सन्मानित करण्यात आले व इतर उपस्थित सहभागी प्राध्यापकांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्र व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पुरुषोत्तम परीट व डॉ. पराग पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. पराग पाटील यांनी मानले, तसेच या संपूर्ण चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. लीना मेश्राम व प्राध्यापिका अवचिते यांनी केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply