ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीवर ज्याप्रकारे संयत अभिनय परंपरा होती, तोच प्रवाह डॉ. लागू यांनी मराठी रंगभूमीत रुजविला. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी असा भेदाभेद त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या मते नाटकांचे दोनच प्रकार असू शकत होते- एक चांगले नाटक आणि दुसरे वाईट नाटक.
‘शेवटी आम्ही सारे लमाण… इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे’ असे वाक्य ‘नटसम्राट’ या नाटकातील ‘गणपतराव बेलवलकर’ यांच्या तोंडी आहे. वयोवृद्ध कलावंत गणपतराव तथा अप्पासाहेब बेलवलकर यांच्या जीवनाची शोकांतिका सांगणारे ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीवर अजरामर ठरले ते डॉ. श्रीराम लागू यांच्या बेजोड अभिनयामुळे आणि लेखक वि. वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिभाशाली लेखनामुळे. वर उल्लेखलेल्या संवादात आलेला ‘लमाण’ हा शब्द अचूक उचलून डॉ. लागू यांनी आपल्या आत्मचरित्राचे नाव ठेवले होते. या प्रतिभावान लमाणाने मंगळवारी रात्री आपल्या खांद्यावरले ओझे कायमचे खाली ठेवले. गिधाडे, इथे ओशाळला मृत्यू, काचेचा चंद्र, किरवंत, उद्ध्वस्त धर्मशाळा अशा अनेक एकाहून एक सरस नाटकांमधून डॉ. लागू रसिकांना गेली अनेक दशके भेटत होते. सूर्य पाहिलेला माणूस या लेखक मकरंद साठे यांच्या नाटकामध्ये उतरत्या वयात देखील त्यांनी केलेला अभिनय कमालीचा देखणा होता. पेशाने नाक, कान, घसा तज्ज्ञ असलेल्या डॉ. लागू यांनी वयाच्या 42व्या वर्षी डॉक्टरीला रामराम ठोकून पूर्णवेळ अभिनय क्षेत्राला वाहून घेतले. मराठी आणि हिंदी रंगभूमीवरील त्यांचे अभिनय-नैपुण्य अल्पावधीतच आदराचे आणि विस्मयाचे स्थान बनले. कारण अशा प्रकारचा अभिनयाचा वास्तववादी अविष्कार भारतीय रंगभूमीला तोवर तसा अपरिचितच होता. रंगभूमीवर सृजनशील अभिनयाचे समाधान जरुर मिळते, परंतु उत्कृष्ट अर्थार्जन साधण्यास ते पुरेसे नाही हे ओळखून डॉ. लागू यांनी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये शेकडो भूमिका केल्या. त्यांनी एकूण 140 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असल्या तरी त्यातील बहुसंख्य चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला छोट्यामोठ्या चरित्र भूमिकाच आल्या. तथापि, सत्तरीच्या दशकामध्ये स्वर्गीय व्ही. शांताराम यांनी पिंजरा या चित्रपटासाठी डॉ. लागु यांना पाचारण केले आणि या चित्रपटाने अक्षरश: इतिहास घडवला. तमाशा कलावंतिणीच्या मागे लागून आपल्या आयुष्याची आणि नीतीमूल्यांची धूळधाण करून घेणार्या मास्तराची भूमिका डॉ. लागू यांनी या चित्रपटात अशाप्रकारे पेलली की भलेभले नतमस्तक झाले. ‘पिंजरा’तील भूमिकेपाठोपाठ ‘सामना’मधील मास्तर असोत किंवा ‘सिंहासन’मधील विश्वासराव दाभाडे, अशा कित्येक महत्त्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या. अभिनयाच्या क्षेत्रात अढळस्थान मिळवलेल्या डॉ. लागू यांनी सामाजिक बांधिलकी जगताना ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगाव प्रयोग केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. डॉ. लागू हे प्रखर बुद्धिवादी कलावंत होते. त्यांच्या या बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तिमत्त्वाची किंमतही त्यांना मोजावी लागली. देव आणि धर्म या संदर्भात त्यांनी केलेली काही जाहीर विधाने वादग्रस्त ठरली. परंतु अभिनय असो किंवा विचार तो तर्कनिष्ठच असला पाहिजे अशा आग्रही भूमिकेपासून ते अखेरपर्यंत ढळले नाहीत. डॉ. लागू यांची कलाकारकीर्द कलावंतांच्या येणार्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल. या अलौकिक प्रतिभावंत कलावंताला मन:पूर्वक श्रद्धांजली.