Breaking News

दिव्यांग ऋषिकेशने केला दुर्गराज रायगड किल्ला सर

म्हसळा : प्रतिनिधी

सेरेब्रल पाल्सी या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या ऋषिकेश सुदाम माळी (वय 16) या विद्यार्थ्याने नुकताच रायगड किल्ला चढून पंगू लंघयते गिरिम हे वचन खरे ठरवले. ऋषिकेश माळी हा म्हसळ्याच्या एआयजे कॉलेजच्या 11 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळास नमन करून गिरिभ्रमणास प्रारंभ केला. समुद्रसपाटीपासून 2851 फूट उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‘, ‘जय भवानी-जय शिवाजी‘ अशा घोषणा देत ऋषिकेशने कूच केली. अवघ्या अडीच तासांत उगवत्या सूर्याबरोबरच ऋषिकेशला गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, राणीमहल, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ येथे पदभ्रमण करीत किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. पुढे हर हर महादेवची गर्जना करत ऋषिकेश जगदीश्वर मंदिरात पोहोचला. त्यानंतर तो महाराजांच्या समाधीसमोर  नतमस्तक झाला. रायगड मोहिमेत ऋषिकेशला शिवभक्त ऋतुजा घरफाळकर (अमरावती), शिवप्रसाद वाघमारे (तुळजापूर), संजय लव्हाळे (माजलगाव, बीड), कैलास कदम, ऋषिकेश सूर्यवंशी (वाशी, मुंबई) यांच्यासह पुण्यातील दयानंद कॉलेजचे प्राध्यापक तसेच पाचाड येथील लामजे बंधू आणि हिरकणीवाडीतील ग्रामस्थांनी साथ दिली. ऋषिकेशने रायगड सर केल्यानंतर राधानगरी, कोल्हापूर येथील कुंभार मॅडम यांनी त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांसह गडावरील राजसभेत ऋषिकेशचे शिवप्रतिमा देऊन विशेष कौतुक केले. जन्मानंतर चार वर्षांपर्यंत ऋषिकेश 90 टक्के दिव्यांग होता. दिव्यांग मुलांना केवळ घरात न ठेवता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कला, छंद व आवड जोपासण्यास मदत करा. जग दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांचे मन सक्षम बनवा, असा संदेश ऋषिकेशची आई शीतल माळी यांनी या वेळी दिला. रायगड मोहीम सर केल्याबद्दल दिव्यांग ऋषिकेशवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply