Breaking News

पनवेल रेल्वे मालधक्का येथील उर्वरित घरांचेही सर्वेक्षण करा

भाजप नगरसेवकांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

अलिबाग : रामप्रहर वृत्त

पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का येथील 165 पैकी 134 रहिवाशांची नावे पुर्नवसनामध्ये आलेली आहेत आणि उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांच्या जागेचा भूसंपादनामध्ये समावेश केलेला दिसून येत नाही. या रहिवाशांकडे योग्य ते रहिवासी पुरावे ओळखपत्र आहेत. त्यामुळे उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक भाजप नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन बुधवारी (दि. 18) रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का येथील रहिवासी हे गेल्या 40 वर्षांपासून तेथे राहत आहेत. रेल्वे संपादन जागेमध्ये आतापर्यंत 165 रहिवाशांची घरे असून, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या 6 ऑगस्ट 2019 रोजीच्या जाहीर नोटीसीद्वारे भूमीसंपादन स्थळपहाणी, चौकशी, तपासणी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन क्रमांक आरपीए-2018/प्र.क.119/र-3/मुंबई, दिनांक 22 मे 2018 अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पाकरिता भूसंपादनामुळे बाधित पात्र बांधकामधारकांच्या पुनर्वसनाकामी समक्ष हजर राहून सर्व्हेक्षणाच्या वेळी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले असून, पनवेल रेल्वे मालधक्का येथील रहिवासी 40 वर्षांपासून त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे या रहिवाशांच्या एकत्रित गटाचा समावेश करून उरलेल्या 30 रहिवाशांच्या घरांचेही पुनर्वसन सोबत करून घ्यावे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पाकरिता भूसंपादनामुळे बाधित पात्र बांधकामधारकांच्या पुनर्वसन व पुन:स्थापनेबाबतचे अधिकार मिळवून द्यावे, अशी स्थानिक भाजप नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे व सुशीला घरत यांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन नगरसेविका अ‍ॅड. वाघमारे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना दिले. या वेळी भाजप कार्यकर्ते जितेंद्र वाघमारे, अशोक आंबेकर, नंदा टापरे, पोपट मुंगसे उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply