नागरिक हैराण; पोलिसांसमोर आव्हान
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरी, ग्रामीण तसेच पनवेलच्या आजुबाजूच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चोरांना कोणतेही भय राहिलेले नसल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान आहे.
फसवणूक, लबाडी, आमिष, घरफोड्या, हातचलाखी, हल्ला, अशा विविध प्रकारे ह्या चोर्या पनवेल परिसरात घडताना दिसत आहे. अशाच काही चोरीच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या जलदरित्या पैसे कमविण्यासाठी काही बेरोजगार वर्ग चोर्यामार्या करू लागला आहे. परिणामी परिसरात चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.
पनवेलमध्ये गेल्या दोन दिवसांत चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी पनवेलमधील कापड बाजारात असलेल्या आ. व्ही. पावस्कर हे ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे तब्बल आठ किलो 720 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तु चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.
पनवेलमधील कापड बाजारात जयप्रकाश पावस्कर यांचे आर. व्ही. ज्वेलर्स नावाचे दुकान असून, त्यांचा वडीलोपार्जित चांदी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पावस्कर यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले होते, मात्र चोरट्यांनी या दुकानाच्या पाठीमागील भाग तोडून दुकानात ग्राहकांना दाखविण्यासाठी शोकेसमध्ये ठेवण्यात आलेले तीन किलो 528 ग्रॅम वजनाचे चांदीचे कंबर चेन, ब्रेसलेट, एक किलो 600 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, तसेच तीन किलो 592 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 14 वाट्या, सहा ग्लास, चार तुप भांडी, चार लामणदिवे, दोन द्रोण असा तब्बल दोन लाख 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
सकाळी जयप्रकाश यांचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.
दुसर्या घटनेत पनवेल परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन मोटरसायकली चोरीस गेल्याची घटना घडल्याने वाहन मालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.
करंजाडे येथे प्रकाश सरवणकर यांनी त्यांची होंडा कंपनीची 20 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल अॅपेक्स व्हिला परिसरात उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर दुसर्या घटनेत नितेश भगत, भगतआळी पनवेल यांनी त्यांची लाईन आळी येथील हनुमान मंदिरसमोर होंडा कंपनीची अॅक्टीव्हा ही गाडी ज्याची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
तिसर्या घटनेत प्रमोद गायकवाड रा. करंजाडे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर जिची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे ही ओरियन मॉलच्या बाजूला विजय सेल्ससमोर उभी करून ठेवली असता तिची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. पनवेल परिसरातून गेल्या काही दिवसात दुचाकी व चार चाकी वाहन चोरीस जाण्याचे प्रकार वाढल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
याचप्रमाणे करंजाडे येथे चरण्यासाठी मोकळ्या जागेत सोडलेल्या एक गाय व तिचे दोन वासरु यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शंकर पवार यांनी त्यांची एक सफेद रंगाची खिल्लारी जातीची गाय व तिचे दोन वासरु ज्याची किंमत जवळपास 35 हजार रुपये इतकी आहे. करंजाडे येथे चरण्यासाठी मोकळ्या जागेत सोडले होते. या वेळी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने तीनही जनावरे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेलमधील सौंदर्यप्रसाधनच्या दुकानातील साहित्य लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. जय श्री महालक्ष्मी कॉस्मेटीक लाईन आळी पनवेल या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी महागडे टॉवेल, पॅन्टीज, ट्रॉली या प्रकारचे सौंदर्यप्रसाधन साहित्य ज्याची किंमत 20 हजार 425 रुपये इतकी आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.