वाहतूक शाखेकडून कडक कारवाईला सुरुवात
पनवेल : वार्ताहर
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अपघात सत्र टाळावे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करू नये या सर्व बाबी केंद्रीत करून वाहतूक शाखेतर्फे परिमंडळ 2 परिसरातील सर्वच वाहतूक शाखेच्या वतीने कडक कारवाईला सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर गावी जात असतो किंवा मुंबईच्या दिशेने जात असतो. या वेळी अनेक जण मद्यप्राशन करून वाहने चालवितात. यातूनच गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होतात. व त्यात नाहक इतरांचा बळी जातो. तर काही जण अपंग सुद्धा बनतात. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. एका गाडीवर तीन-तीनजण बसवून वाहने चालवितात. नियमांचे पालन करीत नाहीत. गाड्यांचे कागदपत्रे नसतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आतापासून वाहतूक शाखेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर तसेच शहरांमध्ये ठिकठिकाणी वाहनांची तपासणी कागदपत्रांची तपासणी, रात्रीच्या वेळी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणार्या वाहन चालकांवर कारवाई, त्याचप्रमाणे बेकायदेशीरित्या वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नियम तोडणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेतर्फे कडककारवाई सुरू झाली आहे.
पालकांनी आपल्या मुलांच्या हाती वाहने देताना त्याच्याकडे पूर्ण कागदपत्रे आहेत. तसेच तो हेल्मेट वापर करीत आहे. याची माहिती घ्यावी. तरुणांनी सुद्धा रस्त्यावर वाहने चालविताना रस्त्यांच्या नियमांचे त्याचप्रमाणे आरटीओ मार्फत देण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.
-अभिजीत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, पनवेल