खारघर ः प्रतिनिधी
सिडकोतर्फे सुरू करण्यात आलेली सार्वजनिक सायकल योजना पर्यावरणपूरक तर आहेच, परंतु सायकलच्या वापरास चालना मिळाल्याने व्यायामासाठी सहज-सोपे साधन उपलब्ध होऊन नागरिकांना निरोगी आयुष्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आ. ठाकूर व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सिडकोच्या सार्वजनिक सायकल योजनेस
प्रारंभ झाला.
या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक-1 अशोक शिनगारे, मुख्य अभियंता केशव वरखेडकर, नवी मुंबई व मेट्रोचे अतिरिक्त मुख्य अभियंता डॉ. के. एम. गोडबोले, जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्रिया रातांबे, वरिष्ठ परिवहन अभियंता गीता पिल्लई, अधिक्षक अभियंता रमेश गिरी, कार्यकारी अभियंता संजय पुढाळे, युलु बाईक्सचे ऑपरेशन हेड दीपक शर्मा आणि स्वच्छ खारघर मंचाच्या मंगल कांबळे हे उपस्थित होते.
या वेळी बोलताना प्रशांत ठाकूर यांनी सिडकोतर्फे लवकरच खारघर ते नवीन पनवेल नोड दरम्यान या योजने अंतर्गत अधिकाधिक सायकली उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले.
लोकेश चंद्र यांनी ही योजना म्हणजे सिडकोने वाहतूक कोंडी आणि प्रदूषणमुक्तीच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल, असे उद्गार काढले.
सदर सार्वजनिक सायकल योजना ही पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टिम तत्त्वावर आधारित आहे. युलु बाईक्सच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येणार आहे. यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात युलु बाईसिकल्सतर्फे ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली होती. तसेच पुणे आणि बंगळुरूमध्येही ही योजने राबविण्यात आली होती.
सदर योजने अंतर्गत शहरात जवळच्या अंतरांवर सायकल स्थानके उभारण्यात येणार आहेत. यामुळे एका स्थानकातून घेतलेली सायकल शहरातील अन्य सायकल स्थानकावर परत करता येणार आहे. आधुनिक व उत्तम स्थितीतील सायकली आणि सायकल स्वारीसाठी आकारण्यात येणारे अल्प भाडे, हे या योजनेचे वैशिष्टय आहे. या योजनेमुळे खारघरमधील नागरिकांना विरंगुळ्या बरोबरच कामाच्या ठिकाणी किंवा इच्छित बस किंवा रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी सायकलीचा वापर करता येणार आहे.
सदर योजना ही व्यक्तिकेंद्री वाहतुकीला चालना देणारी असून खारघर हा अशा प्रकारची सुविधा असणारा पहिला सिडको नोड ठरणार आहे. सायकलच्या वापरामुळे व्यायामाचा हेतू साध्य होण्याबरोबरच कार्बन व अन्य विषारी वायुंचे होणारे उत्सर्जनही टळते.
सिडकोने युलु बाईक्सला खारघर नोडमध्ये एक वर्षाच्या कालावधीकरिता सार्वजनिक सायकल योजना सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. शंभर ठिकाणी सुरू करण्यात येणार्या सायकल स्थानकांमुळे रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणांसह खारघरमधील बहुतांशी ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सिडकोच्या या पर्यावरणपूरक योजनेते सर्व स्तरांतून स्वागत होईल, यात शंका नाही.