खोपोली : प्रतिनिधी
कोट्यवधी रुपये खर्च होऊन नवनिर्माण झालेले खोपोलीतील विरेश्वर उद्यान तसेच विस्तार व डागडुजी करण्यात आलेले महावीर उद्यान बंद आहे. या दोन्ही उद्यानांच्या मुख्य गेटला नगरपालिकेकडून भलेमोठे कुलूप लावण्यात आले असून, नागरिकांना या उद्यानाचा लाभ मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली
जात आहे.
जवळपास एक कोटी सत्तर लाखाचा निधी खर्च झालेल्या खोपोलीतील बहुचर्चित भगवान महावीर उद्यानाचे काम अनेक वर्षापासून कासव गतीने सुरु होते. महावीर उद्यान हे शहरातील एकमेव विविध सुविधा युक्त व मोक्याचे गार्डन असल्याने हे उद्यान नागरिकांसाठी कधी खुले होईल, असा प्रश्न केला जात आहे. या विस्तारित गार्डनमध्ये आजही अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यात प्रामुख्याने प्रस्तावित मिनी ट्रेन, संगीत कारंजे, विद्दुत रोषणाई, सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंतीवरील तारेचे कुंपण, सुशोभीकरनाची प्रमुख कामे अद्यापही रखडली आहेत. दुसरीकडे या गार्डनचे काम घेतलेल्या सायनोरा कंपनीच्या उप ठेकेदाराच्या मते सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र निविदाप्रमाणे जवळपास पन्नास टक्के काम आजही अपूर्ण आहे, म्हणून हे उद्यान वापरासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
दोन वर्षांपुर्वी मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालेले विरेश्वर उद्यानही काही दिवसांतच नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. सदर उद्यान चालविणे, त्याची देखभाल, वेळोवेळी दुरुस्ती करणे नगरपालिकेस परवड नाही. त्यामुळे ठेकेदार नेमण्याचा नगरपालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र नगरपालिकेच्या अटीशर्ती व आर्थिक तरतुदीनुसार कोणीही ठेकेदार सदर उद्यान चालविण्यासाठी पुढे येत नाही.
शहरातील भगवान महावीर उद्यानामध्ये काही अपूर्ण कामे पूर्णत्वास येत असल्याने ते बंद आहे, तर विरेश्वर उद्यान काही प्रशासकीय अडचणीमुळे बंद ठेवण्यात आले आहे. मात्र लवकरच यासंबंधी सर्व अडचणी दूर होऊन, ही दोन्ही उद्याने जानेवारी महिन्यापासून नागरिकांसाठी खुली करण्यात येतील.
-गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपालिका