सिंधुताई सपकाळ यांचा विद्यार्थ्यांना संदेश
पेण : प्रतिनिधी
चटके बसल्याशिवाय आयुष्य काय आहे, हे कळत नाही, म्हणून जीवनात संकटांवर मात करून हिमतीने उभे राहा, असा संदेश निराधारांची माय सिंधुताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे संस्थेच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिंधुताई बोलत होत्या. आपली संस्कृती, संस्कार आणि परंपराची जोपासना करा, असे त्यांनी सांगितले. दु:ख असेल तिथे मी जाते म्हणूनच हजारोंची मी माय झाली आहे. मला देशातील 20 लाख निराधार लेकरांची माय व्हायचे आहे. त्यासाठी सढळ हस्ते मदत करा, असे आवाहन सिंधुताईंनी यावेळी केले. त्याला लागलीच प्रतिसाद देत संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व उपस्थितांनी मदतीचा हात पुढे करून अर्थिक मदत दिली. या वेळी प्रा. संदेश मोरे यांनी सिंधुताई सपकाळ यांची प्रकट मुलाखात घेतली. या मुलाखातीत त्यांनी आपल्या खडतर जीवनाची संघर्षमय कहाणी विद्यार्थ्यांसमोर कथन केली. यावेळी संस्थेच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना गणेशमुर्ति, सन्मानचिन्ह व पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 66 हजार 666 रूपयाचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार धनंजय कांबळे, नायब तहसीलदार प्रमोद जाधव, प्राचार्य एम. व्ही. म्हात्रे, उपप्राचार्य आर. आर. वाघ, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.