Breaking News

कोंढाणे लेणीवर भरकटलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कोंढाणे येथे असलेल्या बुद्धकालीन लेणी पाहण्यासाठी आलेले चार तरुण रस्ता भरकटले होते. त्यांना शोधण्यात यश आले असून, ते सर्व तरुण रात्री कर्जत रेल्वे स्थानकातून आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत.

मुंबई येथून पराह जवनदाल हा आपल्या अन्य तीन मित्रांसह शनिवारी (दि. 4) कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणी येथे आला होता. ते परतीच्या प्रवासात वाट चुकले आणि वाढलेल्या गवतामुळे भरकटले. त्याबाबत रायगड पोलिसांना माहिती मिळताच आपद्ग्रस्त टीमला पाचारण करण्यात आले. त्या टीमचे सदस्य तसेच शिवदुर्ग पथकाचे गिर्यारोहक आणि कोंढाणेे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या कोंदिवडे गावातील ग्रामस्थ यांनी सायंकाळी त्यांची शोधाशोध सुरु केली. लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळाचे तरुण कोंढाणे लेणी येथे पोहचले, त्याचवेळी कोंदिवडे येथील कोंडू आत्माराम घारे यांनी गावातील तरुणांच्या मदतीने रस्ता भरकटलेल्या त्या चार तरुणांना परिसरात अंधार दाटण्यास सुरुवात झाली असता शोधून काढले. त्यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीरंग कसवे आणि लोणावळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक काळे यांनी मदतीला गेलेल्या सर्वांशी संपर्क सुरु ठेवला होता. ते सर्व ट्रेकर्स संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सापडल्यानंतर त्यांना कोंदिवडे गावात आणले. त्यांना कर्जत स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षा करून दिली. रात्री साडे आठ वाजता ते चारही तरुण कर्जत रेल्वे स्थानकात पोहचले. तेथून त्यांनी मुंबईकडे जाणारी उपनगरीय लोकल पकडून आपला पुढील प्रवास सुरु केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply