रेवदंडा : प्रतिनिधी
आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ चौलनाका-वावे या मुख्यः रस्त्यालगत आंबेपुर फाट्यानजीक सापडली असून पुरातत्व खात्याच्या ओळख परेडनंतर रेवदंडा पोलिसांनी ती तोफ जप्त करून ताब्यात घेतली.
रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सिध्देश्वर मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाच्या चवथर्यावर दोन तोफा ठेवण्यात आल्या होत्या. श्री दत्त जयंतीच्या चार दिवस अगोदर त्यातील एक तोफ चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलीस पाटील स्वप्निल तांबडकर यांनी स्थानिक ग्रामस्थांसह या तोफेचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर पुरातत्व विभागाचे अधिकारी गोकुल बिराडे यांनी 1 जानेवारी रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात तोफ चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, रविवारी (दि. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास सितारा चालविणारे जयवंत वाळेकर यांना आंबेपूर फाट्यानजीक एक तोफ बेवारस स्थितीत पडली असल्याचे आढळले. त्यांनी लागलीच रेवदंडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक हर्षद हिंगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पुरातत्व विभागाचे अधिकारी गोकुळ बिराडे, पोलीस पाटील स्वप्निल तांबडकर व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेथे चोरीला गेलेली तोफ आढळली. गोकुळ बिराडे यांनी लागलीच तिला ओळखले. सुहास घोणे, नारायण मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकार तांबडकर व राजेंद्र चिंतामण लोहार यांनी चार चाकी वाहनातून सदर तोफ रेवदंडा पोलीस ठाण्यात आणली. पुढील तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.