नवी मुंबई : बातमीदार
बुधवारी झालेल्या जोरदार पाऊस व वार्यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-96 मध्ये अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावर पडल्या. रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांवरदेखील झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. ही बाब कळताच स्थानिक माजी नगरसेविका रुपाली भगत यांनी तातडीने फायर ब्रिगेडला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी कामात व्यस्त असल्याचे उत्तर देण्यात आले.
माजी नगरसेविका भगत, सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत यांनी आपल्या सहकारी वर्गास सूचना करून झाडे व झाडांच्या फांद्या बाजूला करण्याची विनंती केली. मिळाल्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भगत, अशोक गांडाल, सागर मोहिते, संग्राम चव्हाण यांनी स्वतः कोयता आणि कुर्हाडीच्या मदतीने या ठिकाणावरील पडलेल्या झाडांच्या फांद्या छाटून बाजूला केल्या. याचप्रकारे नेरुळ सेक्टर 2 व 4 येथे 12 ठिकाणी पडलेली झाडे व फांद्या अग्निशमन दलाची वाट न पाहता भाजपच्या युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी स्वतः कामगारांना बोलावून रात्री उशिरापर्यंत काही झाडे रस्त्यांमधून व परिसरातून बाजूला केली.
पोलीस ठाण्यावर कोसळले झाड
कळंबोली : बातमीदार
कळंबोली पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेच्या कार्यालयावर परिसरातील मोठे झाड कोसळून पडल्याने पोलीस ठाण्यातील संगणक फर्निचर तसेच पंधरा वर्षापासून जतन केलेले सर्व गोपनीय कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक वादळी वार्यासह पाऊस पडल्याने कळंबोली करांना विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागले. या वेळी तब्बल सहा ते सात तास वीज गायब झाली होती.
वसाहतीमध्ये सेंट जोसेफ हायस्कूल मार्गावरील तसेच अष्टविनायक हौसिंग सोसायटी मधील एक मोठे झाड रस्त्यावर कोसळून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्याचबरोबर रोडपालीजवळील पल्लवी हॉटेलसमोर मोठे झाड कोसळल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे.
महिला शौचालयाची भिंत कोसळली
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स येथील के. के. आर रोड महाराष्ट्र हॉटेलमागे असलेल्या महिला शौचालयाची भिंत कोसळण्याची घटना घडली. या स्वच्छतालयाच्या शेजारी पाण्याची टाकी आहे. त्या टाकीची भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही भिंत कोसळल्याने महिलांची मात्र शौचालयास जाण्यासाठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने ही भिंत उभारावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शंकर पडुळकर यांनी केली आहे.