Breaking News

सीकेटी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची साद

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित आयोजित श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन 18 ते 24 डिसेंबरदरम्यान नेरे शांतिवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले होते. युवकांनी ग्रामविकासाबरोबर देशाच्या विकासात सकारात्मक द़ृष्टी ठेवून एकतेने रचनात्मक कार्य करावे हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.

या विशेष शिबिराच्या उद्घाटन समारंभात संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करून ’एक भारत, श्रेष्ठ भारत’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचा सल्ला दिला. शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांनी नेरे व वाकडी गावातील मुख्य रस्ते, शाळा, अंगणवाडी परिसराची स्वच्छता केली. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी विविध पथनाट्ये सादर करून गावकर्‍यांना विविध सरकारी योजनांची माहिती दिली, तसेच स्वच्छ भारत अभियान, ग्रामस्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती, आत्मसंरक्षण, स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान, जलसंवर्धन, आरोग्य आदींबद्दलही अवगत केले. 

या सात दिवसीय निवासी शिबिरात उन्नत भारत उपक्रमाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण, वने संवर्धन व जलसंवर्धन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे विविध बौद्धिक सत्रांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व सामाजिक भान जागृत करण्यात आले. यामध्ये मुख्यत्वेकरून डॉ. उत्तम जाधव (राष्ट्रीय सेवा योजना आणि अखंड भारत), मेजर डॉ. अश्लेषा तावडे (आरोग्यम् धनसंपदा), प्रा. डॉ. उमाकांत देशपांडे (एड्स जनजागृती), सुशिला मुंढे आणि प्रा. मच्छिंद्रनाथ मुंढे (अंधश्रद्धा निर्मूलनात युवकांची भूमिका), डॉ. नंदकिशोर एस. चंदन (भारतीय युवक व विविध शैक्षणिक संधी), गणेश चौगुले (प्रशासकीय सेवा आणि सामाजिक उन्नती), अल्लाउद्दीन शेख (भारतीय राज्यघटना आणि स्त्री सक्षमीकरण) यांनी विविध विषयांवर व्याख्यान देऊन मार्गदर्शन केले. याखेरीज शिबिरामध्ये योग शिक्षणाद्वारे सदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. गणित दिवस साजरा करून शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. याबरोबरच कुष्ठरोग निवारण समितीस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज  दूर केले. कुष्ठरुग्णांकडून चालविण्यात येणार्‍या विविध व्यवसायांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

शिबिराच्या समारोप समारंभात संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील व शिक्षकवर्ग उपस्थित होता. वाय. टी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी सात दिवसांच्या यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला. शेवटी उत्कृष्ट स्वयंसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. परकाळे यांच्यासह कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. गणेश साठे, प्रा. सागर खैरनार, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मुनीव, प्रा. विनोद नाईक, एस. एन. कोळी व इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply