Monday , February 6 2023

बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला धोका

किडरोग पडण्याची शक्यता, औषध फवारणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

महाड : प्रतिनिधी

गेल्या कांही दिवसांपासून वातावरणांत सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. या बदलामुळे मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांनी विषेश काळजी करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी आंबा पिकावर नियमित औषध फवारणी करावी, असे आवाहन महाड कृषी उप विभागाीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी केले आहे. महाड, पोलादपुर, म्हसळा आणि श्रीवर्धन या चारही तालुक्यातील हवामान आंबा पिकाला पोषक आहे. संपुर्ण रायगड जिल्ह्यांमध्ये नऊ हजार 775 हेक्टर क्षेत्रामध्ये आंव्याचे उत्पन्न घेण्यांत येते. महाड तालुक्यांत 725 हेक्टर, पोलादपुर मध्ये 151.35 हेक्टर, म्हसळामध्ये 1879 हेक्टर तर श्रीवर्धनमध्ये चार हजार 665.35हेक्टर क्षेत्रांमध्ये आंबा पिकाचे उत्पन्न घेतले जाते. सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. या बदलामुळे शेतकर्‍यांनी सावध राहाण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळी मोहोर दिसू लागतो, त्यावेळी पोपटी रंगाच्या पालवीवर पहिली औषध फवारणी करावी. या साठी डेल्टामेथ्रीन 2.8टक्के प्रवाही किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही औषधाचा वापर करावा. या साठी 10 लिटर पाण्यामध्ये नऊ मि.लि. प्रमाण वापरण्यांत यावे. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणार्‍या तुडतुड्यापासून संरक्षण होते. तुडतुड्यामुळे पानावर चिकटा पडल्याने झाडाला मुंग्या येण्याची शक्यता असते. या फवारणीमुळे मुंग्यांपासूनदेखील संरक्षण होते. दुसरी फवारणी (बोंगे फुटताना) करण्यात यावी. यासाठी लेंम्बडासायहेलोथ्रीन 5 टक्के 6 मि.लि. या प्रमाणांमध्ये वापरण्यांत यावे. भुरी रोगाच्या नियंत्रासाठी प्राधान्याने 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मि.लि.किंवा पाण्यामध्ये विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉर्बेन्डॅझीम 12टक्के, मॅन्कोझेब 63 टक्के 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, असे डॉ. बनसोडे यांनी सांगितले. तिसरी फवारणी 15 दिवसाच्या फरकाने करण्यात यावी. या नंतरच्या फवारण्या करताना 15 दिवसाचे अंतर ठेवण्यात यावे, असे कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे आणि कृषी सहाय्यक किरण कोकरे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे आंबा पिकावरील मोहोरावर किड रोग पडून त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागत असला तरी महाड पोलादपुर तालुक्यामध्ये याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महाड पोलादपूर तालुक्यांतील शेतकर्‍यांनी आंबा पिकाप्रमाणे शेती विषयक अन्य काही अडचणी असल्यास कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे, कृषी सहाय्यक किरण कोकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.प्रफल्ल बनसोडे यांनी केले आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply