Breaking News

चोरी केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्णय

अलिबाग : प्रतिनिधी

 चेंढरे येथील बाफना बाग सोसायटीत चोरी केल्या प्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल चव्हाण याला अलिबागच्या मुख्य न्यादंडाधिकार्‍यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. बाफना बाग सोसायटीतून 28 ऑक्टोबर 2019 रोजी पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस निरीक्षण के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने तपासयंत्रणा कामाला लावल्या होत्या. अवघ्या दोन तासात तळकर नगर येथील अनिल चव्हाण या तरुणास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरून नेलेला पाण्याचा पंप आणि पितळी घंटा असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पुर्ण करुन पोलिसांनी अलिबाग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांच्या न्यायलयात झाली. खटल्यात सहाय्यक सरकारी अभिव्योक्ता म्हणून अ‍ॅड. रुपेश महाकाळ यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान  पाच जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात तक्रारदार हर्षद कशाळकर, पंच जितेंद्र शिगवण, पोलीस शिपाई एस. टी. फड, तपासिक अमंलदार रुपेश नाईक, आणि एस. बी. नाईक यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी पिंगळे यांनी सरकारी अभिव्योक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला, आणि साक्षी, पुराव्यांच्या आधारे आरोपी अनिल चव्हाण याला चोरी केल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि त्याला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने सदर प्रकरणाची सुनावणी केवळ 18 दिवसात पुर्ण केली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार एस. बी. नाईक आणि पोलीस हवालदार एस. एस अडीत यांनी सहकार्य केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply