जिल्ह्यात प्रमाण झाले कमी; पक्षी निरीक्षक व पर्यटक चिंतेत
पाली : प्रतिनिधी
थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मात्र अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि डिसेंबर अखेर देखील थंडीची सुरुवात झाली नसल्याने स्थलांतरित पक्षांचे आगमन कमी प्रमाणात झाले आहे. त्यांना वातावरण बदलाचा फटका बसला आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासक व निरीक्षक आणि पर्यटक
चिंतेत आहेत.डिसेंबरच्या मध्यावर थंडीमध्ये स्थलांतरित पक्षी रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतात. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना ही मोठी पर्वणीच असत, मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षी स्थलांतरित पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे पक्षी अभ्यासक व निरीक्षकांचा हिरमोड झाला आहे. गुलाबी थंडी ची चाहूल लागली की, निसर्गरम्य रायगड जिल्ह्यात परदेशी स्थलांतरित पक्षी आणि काही स्थानिक स्थलांतरित पक्षांची रेलचेल पाहायला मिळत असते, वाढलेल्या गवंतामधील कीटक व आळ्या खाण्यासाठी आणि साठलेल्या जलाशयामधील पाण्यातील कीटक, कृमी, मृदुकाय जीव-जंतू खाण्यासाठी तसेच समुद्र किनारे, दलदलीचे भाग यामधील छोटे खेकडे, मृदुकाय प्राणी, मासे, जल कीटक हे खाऊन पर्यावरणाचे संरक्षण व जैवविविधता समृद्ध करण्यात हे पक्षी महत्वाची भूमिका बजावत असतात. या पक्षांचे दर्शन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, दलदलीच्या जागा, जंगले, भातशेते, खाड्या तसेच गवताळ प्रदेशात होत आहे.
उत्तर गोलार्धातील युरोप ,रशिया आणि उत्तर अमेरिका यासारख्या देशात थंडीच्या दिवसात पडणार्या बर्फामुळे जमिनीवरील भूभाग हा बर्फाने आच्छादलेला असतो त्यामुळे पक्षांना खाद्य मिळणे कठीण होऊन जाते म्हणून हे पक्षी विविध देशात स्थलांतर करून आपली उपजीविका भागवतात. तसेच आपल्याकडे पडणारी थंडी आणि पुरेशा प्रमाणात मिळणारे खाद्य तसेच योग्य अधिवास या सर्व कारणांमुळे या पक्षांना आपली घरटी बांधून पिल्लांचे संगोपन करणे सोपे जाते, म्हणून बर्याच स्थलांतरित पक्षांचा विणीचा काळ सुद्धा हाच असतो, असे माणगाव तालुक्यातील विळे-भागाड येथील पक्षी अभ्यासक राम मुंडे यांनी
सकाळला सांगितले.
Check Also
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक
शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …