Breaking News

जलमार्गाने गाठा नवी मुंबई विमानतळ ; सिडकोतर्फे चाचपणी सुरू, बीपीटीच्या सहकार्याने सेवा

पनवेल ः बातमीदार

आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. 2020मध्ये या

विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे दळणवळणाच्या साधनांवर भर दिला जात आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवशांना जलदगतीने कमीत कमी वेळात पोहचता यावे यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. बीपीटीच्या सहकार्याने जलमार्ग सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला 20 दशलक्ष प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला 60 दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी जलद दळणवळणाच्या साधनांची गरज भासणार आहे. त्यानुसार सिडको व राज्य शासन विविध पर्यायांवर विचार करीत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी-लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे, उन्नत मार्ग आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहचता यावे यादृष्टीने जलमार्गाचा प्रकर्षाने विचार केला जात आहे. त्यानुसार बेलापूर व तरघर परिसरात जेट्टी उभारता येईल का, याबाबत सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अलीकडेच बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. बेलापूर खाडीपुलाच्या उलवे बाजूच्या खाडीकिनारी पूर्व व पश्चिम बाजूची तपासणी करण्यात आली. यामध्ये खाडीपुलाच्या पश्चिम बाजूस खाडीच्या पाण्याची खोली जास्त असल्याने या बाजूची जागा जेट्टी उभारणीसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष सिडकोच्या संबंधित विभागाने काढला आहे. त्याचबरोबर तरघर रेल्वे स्थानक परिसरातून विमानतळ क्षेत्राला जोडणार्‍या खाडी चॅनेलचा पर्यायही पडताळून पाहिला जात आहे. या ठिकाणची प्रस्तावित जेट्टी विमानतळ क्षेत्राजवळ असली तरी येथील खाडीमधील मोठ्या प्रमाणातील खारफुटीमुळे या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास तरी बेलापूर खाडी पुलाजवळील जागा ही जेट्टी उभारण्यासाठी योग्य असल्याचे सिडकोचे मत आहे. त्यानुसार या ठिकाणी जेट्टीचा प्रकल्प उभारण्यासाठी अंदाजित 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

– मुंबई, ठाणे, नवी मुंबई जोडली जाणार आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रस्ताव जलद व्हावा यादृष्टीने सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. सध्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून नवी मुंबईत वाशी, नेरुळ व बेलापूर येथे जेट्टी उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर बेलापूर येथील खाडीकिनारी सिडको व मेरिटाइम बोर्डाच्या सहकार्याने मरीना प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी परिसर जोडणे शक्य होणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply