कर्जत ः बातमीदार
कर्जतमधील नेरळ येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश सेंटर उघडण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत असे हँडवॉश सेंटर असलेली नेरळची कन्या शाळा पहिली शाळा ठरली असून या शाळेचे आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करायला हवे, असे मत कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे यांनी व्यक्त केले.
कन्या शाळेत उभारण्यात आलेल्या हँडवॉश सेंटरचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी आपल्या दुपारच्या सुटीमध्ये सोबत आणलेला आणि शाळेतील पोषण आहार खाण्यास घेतात. त्या वेळी शाळेने लावलेल्या शिस्तीप्रमाणे विद्यार्थी नळाखाली हात धुवून येतात, पण नेरळ येथील कन्या शाळेने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये यासाठी चक्क हँडवॉश उपलब्ध करून दिले आहेत. हे हँडवॉश चक्क तेथील नळांवर उपलब्ध करून देण्यात आले असून त्या हँडवॉश केंद्राचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मानावे आणि नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरळ कन्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष नाईक होते.
या वेळी नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळमध्ये अशा प्रकारे वेगळे उपक्रम राबविणारी शाळा आहे याचा आम्हाला अभिमान असून नेरळ ग्रामपंचायत शाळांना कोणत्याही अडचणी आल्यास आणि मदत मागितल्यास ती मदत आम्ही देण्यास तयार असू, असे स्पष्ट आश्वासन दिले, तर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छताही प्राधान्याने पाहिली पाहिजे, असे आवाहन सभापती सुजाता मनवे यांनी केले.