लक्ष्मण मानेंचे आंबेडकरांवर शरसंधान
मुंबई ः प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधणार्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणार्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. आघाडीत आता अन्य लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा राहिलेली नाही, असा खळबळजनक आरोप करत वंचित बहुजन आघाडीतून फारकत घेतलेले वंचितचे महत्त्वाचे नेते लक्ष्मण माने यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडत वंचितमध्ये उभी फूट पडत असल्याचे अधोरेखित केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता आपण त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे सांगताना, पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणार्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी केली आहे.
वंचितचे सांगलीतून लोकसभेसाठी उभे राहिलेले गोपीचंद पडळकर हे एका संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तसेच आमचे मत न घेताच त्यांनी त्यांना पक्षाचे प्रवक्ते केले, असा आरोप माने यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांना आम्हीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष केले, मात्र त्यांच्या कामाची पद्धत चुकीची असल्याने आपण त्यांच्यापासून दूर होत असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळेच वंचितवर एका पक्षाची बी टीम असे आरोप होत असतात. आंबेडकर असे वागल्यामुळेच हे आरोप होत असल्याचे माने म्हणाले. मी कट्टर आंबेडकरवादी असून कधीही अन्य कुणाचे समर्थन करू शकणार नाही, असे म्हणत माने यांनी आंबेडकर यांना टोला लगावला. प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरूनच आपण प्रवक्तेपदासाठी पडळकरांचे नाव सुचवून त्यांना अनुमोदन दिल्याचे माने म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर याची प्रतिक्रिया मात्र कळू शकलेली नाही.
लक्ष्मन माने राष्ट्रवादीचे हस्तक लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हस्तक आहेत. माने यांचे म्हणणे स्वीकारण्याजोगे नसून त्यांचे दुखणे काही वेगळेच आहे. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी माने यांनीच आपले नाव सूचवले, तसेच अनुमोदनही त्यांनीच दिले, याकडेही पडळकर यांनी लक्ष्य वेधले. -गोपीचंद पडळकर
मानेंचा प्रवक्तेपदाचा राजीनामा
दरम्यान, आपण प्रवक्तेपदाचा राजीनामा आंबेडकर यांच्याकडे सोपवला असून आपण आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असा उल्लेख असलेले पत्र आंबेडकर यांना पाठवल्याचे माने म्हणाले. वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचा दावाही माने यांनी केला आहे.