पोलादपूर : प्रतिनिधी
आई शेवंतीबाई (वाडी) फाउंडेशनतर्फे पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावरील वाडी तुटवली येथे नियोजित गोशाळेचा भूमिपूजन सोहळा नुकताच होमहवनाने करण्यात आला. गोशाळेचे संकल्पना असलेले डॉ. विनोदराव मोरे यांनी सपत्नीक होमहवनाचे विधी केले. मध्यप्रदेशातील कॅबिनेट दर्जाचे मंत्री महामंडलेश्वर स्वामी कम्प्युटरबाबा यांनी होमहवनाचे विधी पूर्ण केले. यानंतर उमरठ येथील महिला मंडळातर्फे हरिपाठ आणि खोपड ग्रामस्थ भजन मंडळींनी कार्यक्रम सादर केला. पोलादपूर तालुक्यातील गोवंशाच्या भाकड जनावरांसह सर्व गोमातांना सामावून घेण्यासाठी तसेच त्यांचे मोकळया माळावर शुध्द हवेमध्ये पालनपोषण आणि संगोपन करण्यासाठी गोशाळेची उभारणी करण्याचा संकल्प डॉ. विनोदराव मोरे यांनी त्यांच्या आई शेवंतीबाई (वाडी) फाउंडेशनच्या माध्यमातून केला असून, तुटवली गावाकडील काळकाई मातेच्या मंदिरासमोरील शेतजमिनीवर या गोशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथील स्वामी कालिदास महाराज, शेळी संस्थेचे प्रभारी इंदोरचे परमेश्वर येवले पाटील यांच्यासह निवे, ताम्हाणे, चांभारगणी, मोरगिरी, क्षेत्रपाळ, कुडपण, परसुले, आड, गोळेगणी, कोतवाल, कापडे आणि पायटे परिसरातील ग्रामस्थ या भुमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते.