
महाड : प्रतिनिधी
हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या महाडमधील मुक्तांगणच्या दिव्यांग (मतिमंद) मुलांकरिता नुकतेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवेनगर येथील हिरवळ संस्थेच्या प्रांगणामध्ये भरविण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांकडून शारीरिक तपासणी करण्यात आली. टेलेंटक्युब एज्युकेशन अँड ट्रेनिंग कन्सल्टसीचे फाऊंडर व कौसिलर डॉ. भाग्यवान मांजरेकर, फिजिओथेरॉपिस्ट डॉ. राजेश गुजर, महिला रोग तज्ज्ञ डॉ. रश्मी शेट, डॉ. कैलास आवटे, नेत्रतज्ज्ञ जर्नलसिंग गौड, शाळेच्या संचालिका विद्या गुजर आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्वामधील बौद्धीक पातळी मोजण्यात आली, त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिराला मुलांकडून आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे संचालिका मंजुशा साबळे यांनी सांगितले.