ग्रामस्थ ठोकणार शाळेला टाळे; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तीन वर्षांपासून येथील शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप शिक्षकच आले नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे अनेकवेळा मागणी करूनही अद्याप शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देवपाडा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. देवपाडा येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून तेथे देवपाडा गावासह आजूबाजूच्या आदिवासीवाडीतील सुमारे 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत मुख्याध्यापक व चार सहशिक्षक आहेत. परंतु आठवीपर्यंतची शाळा असल्याने शिक्षकांची कमतरता भासत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु जिल्हा परिषदेने या शाळेकडे दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने पुन्हा एकदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन दिले आहे. देवपाडा शाळेवर सात दिवसात शिक्षकाची नेमणूक करावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती शाळेला टाळे ठोकू व जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेऊ, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिणारे यांनी शिक्षण विभागाला दिला आहे.
देवपाडा शाळेत अनेक वर्षांपासून शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांची नेमणूक करण्यासंदर्भात कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. आम्ही पुन्हा एकदा शिक्षकाची मागणी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. सात दिवसात शिक्षणाची नियुक्ती केली नाही तर आम्ही शाळेला टाळे ठोकू असेही शिक्षण विभागाला कळविले आहे.
-लक्ष्मण शिणारे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, देवपाडा
सर्वशिक्षा अभियानातंर्गत कर्जत तालुक्यातील 150 शिक्षकांचे प्रशिक्षण किरवली येथे सुरु आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भासत आहे. मात्र महिनाभरात देवपाडा शाळेला शिक्षक दिला जाईल. तसे पत्रदेखील काढण्यात आले आहे.
-सी. एस. रजपूत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत